चीनला विरोध म्हणजे एकाधिकारशाही व क्रौर्याविरोधात स्वातंत्र्याचा संघर्ष – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा घणाघात

चीनला विरोध म्हणजे एकाधिकारशाही व क्रौर्याविरोधात स्वातंत्र्याचा संघर्ष – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा घणाघात

वॉशिंग्टन – ‘जगातील अनेक देश आम्हाला सध्या सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका व चीनपैकी एक अशी निवड करायची नाही, असे सांगतात. संघर्ष अमेरिका व चीन असा नाही, हे लक्षात घ्या. एकीकडे एकाधिकारशाही, अमानुष क्रौर्य आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य असे हे द्वंद्व आहे. त्यासाठी अमेरिकेने क्वाड, आसियन, नाटो यासारख्या संघटनांना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. या संघटनेचा भाग असलेल्या देशांना, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीपासून असलेल्या राक्षसी धोक्यांची जाणीव करून देण्यात आली आहे’, अशा घणाघाती शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात घेतलेल्या आक्रमक निर्णयांची माहिती देऊन, मोहीम अजूनही संपलेली नाही, असे सूचक विधान केले.

एकाधिकारशाही

अमेरिकेसह जगभरात लाखो बळी घेणाऱ्या कोरोना साथीमागे चीन हाच सूत्रधार असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनच्या विरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला आहे. याच संघर्षा अंतर्गत अमेरिकी जनतेसह सहकारी तसेच मित्रदेशांना चीनच्या कारस्थानाची माहिती करून देण्यासाठी प्रचार मोहीम आखण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी अमेरिकेतील विविध कार्यक्रमांमध्ये चीनबाबतची कठोर भूमिका मांडत होते. गेल्या काही महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन, तपासयंत्रणा ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे व अॅटर्नी जनरल विल्यम बार यांनी, आपल्या भाषणांमधून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांकडे लक्ष वेधले होते. परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यात आघाडीवर असून त्यांनी सातत्याने चीनविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

जुलै महिन्यात, पॉम्पिओ यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा उल्लेख ‘चिनी भस्मासूर’ असा केला होता. त्यानंतर, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांचा धोका शीतयुद्धाच्या काळातील रशियन संघराज्यापेक्षाही अधिक भयंकर आहे, असा इशाराही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता. विरोधी नेते व विश्लेषकांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारी टीका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेचा भाग असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणुकीनंतरही परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनला लक्ष्य करून हे आरोप निराधार असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी राजधानी वॉशिंग्टनमधील, ‘रोनाल्ड रिगन इन्स्टिट्यूट’मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात, पॉम्पिओ यांनी चीनची कम्युनिस्ट पार्टी हा सध्या जगातील पहिल्या क्रमांकाचा धोका असल्याचे बजावले.

एकाधिकारशाही

‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा उद्देश, आपल्याकडे असलेल्या क्षमतांचा वापर करून संपूर्ण जगावर प्रभाव टाकण्याचा आहे. हेच ट्रम्प प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान होते.बयेणाऱ्या दशकांमध्ये अमेरिकेला याच आव्हानाचा मुकाबला करावा लागेल’, असा इशारा पॉम्पिओ यांनी दिला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आक्रमक निर्णय घेऊन चीनविरोधात मोहीम छेडली आहे आणि ती पुढेही कायम राहील, असे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले. अमेरिका आपल्या सहकारी देशांचीही मदत घेत असून चीनला एकत्रितरित्या प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी, सोव्हिएत युनियन विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणले होते, याची आठवण करून दिली. चीनच्या बाबतीतही याची पुनरावृत्ती होईल, असा दावाही पॉम्पिओ यांनी केला. सोव्हिएत युनियनप्रमाणेच चीनची जनताही त्यांच्या राजवटीचे भवितव्य ठरवेल, याकडे अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, अमेरिकेने चीनविरोधात छेडलेला राजनैतिक संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने हाँगकाँगच्या मुद्यावरून चीनच्या चार अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले होते. त्यानंतर आता तैवानबरोबर व्यापारी चर्चा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी तैवानच्या शिष्टमंडळाला अमेरिकेत आमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेकडून परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info