डोनेत्स्क प्रांतातील संघर्षात रशियन लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी

- रशियाच्या संरक्षण विभागाची माहिती

मॉस्को – डोनेत्स्क प्रांतातील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या प्रखर संघर्षात रशियन लष्कराने दोन वरिष्ठ अधिकारी गमावले आहेत. रशियाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी याची माहिती दिली. गेल्या आठवड्याभरात रशियाच्या मोहिमेला बसलेला हा चौथा मोठा धक्का ठरला आहे. एकापाठोपाठ बसलेल्या या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली असावी, असे दावे रशियन वर्तुळातून करण्यात येत आहेत.

डोनेत्स्क

गेल्या आठवड्यात युक्रेनने २४ तासांच्या अवधीत रशियातील तीन प्रांतांमध्ये ड्रोन हल्ले चढविले होते. त्यानंतर युक्रेनी लष्कराने बाखमत तसेच डोन्बासमधील काही महत्त्वाच्या भागांमध्ये मोठे हल्ले करून रशियाच्या बचावफळीला धक्का दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. शनिवारी युक्रेनच्या लष्कराने ब्रिआन्स्क प्रांतात केलेल्या हल्ल्यात रशियाची दोन लढाऊ विमाने व दोन लष्करी हेलिकॉप्टर्स उडवून दिली. त्यापाठोपाठ आता रशियाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे.

डोनेत्स्क

डोनेत्स्क प्रांतातील क्रास्नोय भागानजिक झालेल्या संघर्षात ‘फोर्थ मोटराईझ्ड् रायफल ब्रिगेड’चे कमांडर असणाऱ्या कर्नल व्हॅचेस्लॅव्ह माकारोव्ह यांचा मृत्यू झाल्याचे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्त्वाखालील तुकडीने युक्रेनविरोधात लढताना दोन मोठे हल्ले परतविले, मात्र तिसऱ्या हल्ल्यात कर्नल व्हॅचेस्लॅव्ह माकारोव्ह गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती लेफ्टनंट जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी दिली. तर बाखमतमध्ये सुरू असलेल्या प्रखर लढाईत ‘आर्मी कॉर्प्स’चे डेप्युटी कमांडर कर्नल येव्गेनी ब्रोव्हको यांचा बळी गेल्याचे संरक्षण विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

डोनेत्स्क

गेले १४ महिने युक्रेनविरोधात सुरू असलेल्या संघर्षात रशियाने संरक्षणदलातील २०हून अधिक वरिष्ठ अधिकारी गमावल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमे तसेच यंत्रणांनी केले होते. मात्र रशियाकडून यासंदर्भातील बातम्यांना दुजोरा देण्यात आला नव्हता. त्यामुळे २४ तासांमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा झालेला मृत्यू व त्याची कबुली देण्याची घटना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या अधिकाऱ्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर रशियन वर्तुळातून युक्रेनने प्रतिहल्ले सुरू केल्याचे दावेही करण्यात येत आहेत. यापूर्वी रशियाकडून फक्त ‘वॅग्नर ग्रुप’च्या प्रमुखांनी युक्रेनचे ‘स्प्रिंग काऊंटरऑफेन्सिव्ह’ सुरू झाल्याचे वक्तव्य केले होते.

दरम्यान, युक्रेनने लुहान्स्क प्रांतातील हवाईदलाच्या केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे समोर आले आहे. या केंद्रात रशियन लष्कराची तुकडी तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. युक्रेनने या हल्ल्यासाठी ब्रिटनने दिलेली ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्रे वापरल्याचा दावाही करण्यात आला आहे. ब्रिटीश क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याची गेल्या ४८ तासांमधली ही दुसरी घटना ठरली आहे. या हल्ल्यापाठोपाठ युक्रेनने बाखमतमध्ये रशियन नियंत्रणाखाली असलेला काही भाग ताब्यात घेतल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र रशियाने हा दावा फेटाळला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info