इथिओपियामध्ये भीषण दहशतवादी हल्ल्यात ३४ जणांचा बळी

इथिओपियामध्ये भीषण दहशतवादी हल्ल्यात ३४ जणांचा बळी

अदिस अबाब – पश्चिम इथिओपियात प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३४ जणांचा बळी गेला आहे. या भीषण हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून इथिओपियाच्या उत्तरेकडील तिगरे प्रांतात बंडखोरांनी सरकारविरोधात संघर्ष पुकारला असून याची झळ शेजारच्या इरिट्रियालाही बसली आहे. इथिओपियन सरकार आणि तिगरे बंडखोरांमधील संघर्ष वेळीस आटोक्यात आणला नाही तर इथिओपियामध्ये गृहयुद्ध भडकेल, असा इशारा विश्लेषक देत आहेत.

इथिओपिया

इथिओपियाच्या बेनिशंगूल-गुमूझ भागात एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार करुन हाहाकार माजविला. स्थानिक मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ३४ जणांचा बळी गेला असून येत्या काही दिवसात बळींची संख्या वाढू शकते, अशी चिंता व्यक्त केली जाते. गेल्या तीन महिन्यात या भागात झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत शनिवारच्या हल्ल्याची तीव्रता भयंकर होता, असे मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. याआधीही इथिओपियाचे पंतप्रधान अबिए अहमद यांनी आपल्या देशातील हल्ल्यांसाठी सुदानला जबाबदार धरले होते. इथिओपियातील बंडखोरांना सुदानमध्ये प्रशिक्षण आणि आश्रय मिळत असल्याचा आरोप पंतप्रधान अहमद यांनी केला होता.

बेनिशंगूल-गुमूझमधील बसवर झालेला दहशतवादी हल्ला आणि गेल्या दोन आठवड्यांपासून इथिओपियाच्या उत्तरेकडील तिगरे प्रांतात सुरू असलेला संघर्ष यात थेट संबंध नसल्याचा दावा इथिओपियन यंत्रणा करीत आहेत. तिगरे प्रांतातील बंडखोर नेते डेब्रेशन गेब्रेमिशेल यांनी पंतप्रधान अहमद यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. इथिओपियन सरकार आणि तिगरे बंडखोरांमधील या संघर्षामुळे आत्तापर्यंत १२ हजाराहून अधिक जण सुदानमध्ये स्थलांतरीत झाले आहेत.

इथिओपिया

आत्तापर्यंत इथिओपियापर्यंत मर्यादित असलेल्या या संघर्षाचा भडका शेजारच्या इरिट्रियामध्येही उडाला आहे. तिगरे बंडखोरांनी रविवारी इरिट्रियाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ले चढविले. या हल्ल्यात किती नुकसान झाले, याचे तपशील जाहीर केलेले नाहीत. पण इरिट्रियाचे सरकार इथिओपियन पंतप्रधान अहमद यांना आपल्याविरोधात लष्करी सहाय्य करीत असल्याचा आरोप तिगरे बंडखोर नेते गेब्रेमिशेल यांनी केला. म्हणूनच इरिट्रियावर हल्ले चढविल्याचे गेब्रेमिशेल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून इथिओपियामध्ये सत्ता आणि खनिजसंपत्तीवरील मालकीसाठी बंडखोर आणि वांशिक गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. यापैकी बेनिशंगूल-गुमूझमधील संघर्षात शेकडो जणांचा बळी गेला तर हजारो जण विस्थापित झाले आहेत. अशातच तिगरे येथील बंडखोरांनी उठाव केला असून इथिओपियाच्या लष्करातील काही अधिकारी व सैनिक देखील या बंडात सहभागी झाले आहेत. तिगरे बंडखोरांनी इथिओपियन सरकारविरोधात पुकारलेला हा संघर्ष तसेच इथिओपियातील इतर छोट्या-मोठ्या बंडखोर संघटनांना वेळीच आवर घातला नाही तर आफ्रिकेतील आणखी एका देशात गृहयुद्ध भडकून देशाचे विभाजन होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info