अमेरिका-चीन युद्धात फिलिपाईन्सही ओढला जाईल – फिलिपाईन्सच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

अमेरिका-चीन युद्धात फिलिपाईन्सही ओढला जाईल – फिलिपाईन्सच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग/मनिला – ‘अमेरिका व चीनमध्ये साऊथ चायना सी क्षेत्रात युद्ध भडकण्याची शक्यता बळावत असून युद्ध सुरू झाल्यास फिलिपाईन्सही त्यात ओढला जाईल’, असा इशारा संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेन्झाना यांनी दिला. हे संभाव्य युद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान असल्याचेही फिलिपिनी संरक्षणमंत्र्यांनी बजावले. फिलिपाईन्सकडून युद्धाचा इशारा दिला जात असतानाच अमेरिकेने या देशाला संरक्षणसज्ज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या सात दिवसात अमेरिकेने फिलिपाईन्सला ‘स्मार्ट बॉम्ब्स’ तसेच प्रगत ड्रोन्सचा पुरवठा केल्याचे समोर आले आहे.

अमेरिका-चीन

साऊथ चायना सीबाबत आग्नेय आशियाई देशांचा बदललेला सूर व त्याला अमेरिकेसह इतर प्रमुख देशांकडून मिळणारा पाठिंबा यामुळे चीन प्रचंड अस्वस्थ आहे. या पार्श्‍वभूमीवर, फिलिपिनी मंत्र्यांनी दिलेले युद्धाचे संकेत व त्यातील सहभागाबाबत केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. यावेळी संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेन्झाना यांनी, चीनने तटरक्षक दल व ‘नॅव्हल मिलिशिया’ला शस्त्रसज्ज करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला.

अमेरिका व चीन हे दोन्ही देश आपल्या साऊथ चायना सीमधील हालचाली बचावात्मक असल्याचा दावा करीत आहेत. मात्र गैरसमजातून संघर्षाचा भडका उडण्याची भीती कायम आहे’, असे संरक्षणमंत्री लॉरेन्झाना म्हणाले. यावेळी त्यांनी 2018 साली अमेरिका व चीनच्या विनाशिकांची टक्कर थोडक्यात वाचली होती, याची आठवण करून दिली. ‘अशाच एखाद्या घटनेतून अमेरिका व चीनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यास फिलिपाईन्सही त्यात ओढला जाऊ शकतो. साऊथ चायना सी क्षेत्रात फिलिपाईन्स मोक्याच्या ठिकाणी असल्याने या क्षेत्रातील युद्धात फिलिपाईन्सला उतरणे भाग पडेल’ं, असा दावाही त्यांनी केला.

गेल्या काही वर्षात फिलिपाईन्सने अमेरिका व चीन या दोन्ही देशांशी योग्य संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले, याकडेही फिलिपिनी संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, साऊथ चायना सीमधील चीनच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेने या क्षेत्रातील इतर देशांना सज्ज करण्याचे धोरण आखले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्या दौऱ्यात फिलिपाईन्सला दोन कोटी डॉलर्सचे ‘स्मार्ट बॉम्ब्स’ व इतर यंत्रणा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी अमेरिकेच्या ‘एअरफोर्स सेक्रेटरी’ बार्बरा बॅरेट यांनी फिलिपाईन्सला भेट दिली. या भेटीत फिलिपाईन्सला आठ ‘स्कॅनइगल’ ड्रोन्स देण्यात आली आहेत. सुमारे दीड कोटी डॉलर्स मूल्याची ही ड्रोन्स सागरी टेहळणीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती फिलिपिनी अधिकाऱ्यांनी दिली.

अमेरिका-चीन

चीनकडून गेले काही वर्षे साऊथ चायना सीवर ताबा मिळविण्यासाठी जोरदार कारवाया सुरू आहेत. 2016 साली आंतरराष्ट्रीय लवादाने चीनच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर चीन अधिकच आक्रमक झाला असून आग्नेय आशियाई देशांना धमकाविण्याचा, दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आर्थिक व लष्करी सामर्थ्याचा वापर करण्यात येत आहे. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनबरोबरील संघर्ष टाळण्यासाठी सहकार्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र त्यानंतरही चीनने फिलिपाईन्सच्या हद्दीत घुसखोरी करण्याचे व दबाव टाकण्याचे थांबवलेले नाही.

त्यामुळे फिलिपाईन्सने या मुद्यावर अमेरिकेशी असलेले सहकार्य कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी साऊथ चायना सीमधील वादाबाबत आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या निर्णयावरून कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. आवश्‍यकता भासलीच तर या क्षेत्रात फिलिपाईन्सविरोधात होणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकी नौदलाचे सहाय्य घेऊ, असेही दुअर्ते यांनी बजावले होते. आग्नेय आशियाई देशांचा गट असलेल्याा ‘आसियन’ने आपल्या बैठकीत चीनच्या कारवायांचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदविला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info