वॉशिंग्टन – ‘ज्यो बायडेन अमेरिकेची सूत्रे हाती घेण्याआधी इराणला असे काही कोंडीत पकडा की त्याने इराणची राजवट गुदमरुन जाईल. बायडेन यांना इराणबरोबर अणुकरार करताच येणार नाही, असे पर्याय वापरा. मात्र ही कारवाई करताना तिसरे महायुद्ध पेटणार नाही, याची मात्र काळजी घ्या’, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांना दिले आहेत. अमेरिकेतील ‘डेलि बिस्ट’ या वृत्तसंस्थेने व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली.
गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला होता. पण परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ सल्लागारांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या निर्णयावर असहमती व्यक्त केली होती. अमेरिकेने इराणवर हल्ला चढविला तर त्याचे पर्यावसन तिसऱ्या महायुद्धात होईल, याकडे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ व सहकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षांचे लक्ष वेधले. त्यानंतर पॉम्पिओ व सहकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इराणबाबत वेगळे पर्याय सुचविले होते, अशी बातमी व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिली होती.
आत्ताही अमेरिकेतील वृत्तसंस्थेने व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांचा हवाला दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ तसेच इराणविषयी नियुक्त केलेले विशेषदूत एलियट अब्राम्स यांना इराणबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. बायडेन यांच्या शपथविधीच्या आधी इराणची गळचेपी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे सर्वाधिकार पॉम्पिओ यांना दिले आहेत. यामध्ये इराणची राजवट गुदमरेल असे कठोर निर्बंध लादण्याचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स तसेच अणुकार्यक्रमाशी संबंधितांवर निर्बंध लादले होते. त्याचबरोबर येत्या काही दिवसात इराणवर अधिक निर्बंध लादले जातील, असा इशाराही अब्राम्स यांनी दिला होता. इराणविरोधातील या कारवाईचा भाग म्हणून पॉम्पिओ यांनी गेल्या आठवड्यात इस्रायल, सौदी अरेबिया, युएई, बाहरिन या देशांना भेट दिल्याचे अमेरिकी वृत्तसंस्थेने लक्षात आणून दिले.
या व्यतिरिक्त इराणच्या विरोधात छुपी कारवाई करण्याच्या पर्यायावरही परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ, विशेषदूत अब्राम्स आणि अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या अध्यक्षा जिना हॅस्पेल यादेखील काम करीत असल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला. इराणविरोधातील छुप्या कारवाईत इस्रायलचा वापर करता येईल व अमेरिकी सैनिकांचा बळी जाणार नाही, अशा योजनेवर हे तिघेही काम करीत असल्याचे सदर वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. हॅस्पेल आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख योसी कोहेन यांच्यात यासाठी सहकार्य सुरू असल्याचा दावा अमेरिकेतील अभ्यासगट ‘फाऊंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसिज्’चे अध्यक्ष मार्क डुबोवित्झ यांनी केला.
दरम्यान, अमेरिकी वर्तमानपत्र व वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या या बातम्यांवर ट्रम्प प्रशासनाने प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी इराणमध्ये अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येबाबतही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चकार शब्दही काढलेला नाही. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील या हत्येवर बोलण्याचे टाळले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |