11 दिवसांचा इस्रायलबरोबरील संघर्ष म्हणजे युद्धाचा सराव होता – हमासचा नेता याह्या सिन्वर

11 दिवसांचा इस्रायलबरोबरील संघर्ष म्हणजे युद्धाचा सराव होता – हमासचा नेता याह्या सिन्वर

गाझा – इस्रायलबरोबर हमासने छेडलेला 11 दिवसांचा संघर्ष म्हणजे युद्ध नव्हते. तर तो केवळ युद्धाचा सराव होता, असा इशारा हमासचा नेता याह्या सिन्वर याने दिला. हमासकडे 100 ते 200 किलोमीटरचा पल्ला असलेल्या शेकडो रॉकेट्सचा मारा एका मिनिटात करण्याची क्षमता आहे. ही क्षमता हमासने वापरली नाही, असा दावा करून सिन्वर याने हमासचे दहा हजार आत्मघाती हल्लेखोर इस्रायलमध्ये सज्ज असल्याची धमकी दिली.

याह्या सिन्वर

इस्रायल आणि गाझातील हमास यांच्यात संघर्षबंदी लागू झाली. त्यापाठोपाठ इस्रायलने मानवतावादी सहाय्यासाठी गाझाची सीमा खुली केली. आता आंतरराष्ट्रीय स्तरातून गाझासाठी सहाय्य येऊ लागले आहे. अशा परिस्थितीत, हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी गाझापट्टीत मोठी सभा घेऊन इस्रायलबरोबरच्या संघर्षात आपला विजय झाल्याची घोषणा केली. गाझातील हमासचा प्रमुख याह्या सिन्वर याने घेतलेल्या सभेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होत आहे.

या सभेमध्ये सिन्वरने इस्रायलबरोबर येत्या काळात मोठे युद्ध पेटेल, असे स्पष्ट संकेत दिले. ‘संघर्षबंदी लागू होण्याच्या काही तास आधी हमास इस्रायली शहरांवर 300 रॉकेट्सचे हल्ले चढविण्याची तयारी झाली होती. यापैकी 150 रॉकेट्स एकट्या तेल अविववर डागण्यात येणार होती. पण या संघर्षबंदीसाठी प्रयत्न करणार्‍या इजिप्त आणि कतारचा आदर राखण्यासाठी आम्ही हे रॉकेट हल्ले चढविले नाहीत’, असा दावा सिन्वरने केला. तसेच इस्रायलबरोबर बिनशर्त संघर्षबंदी झाली असली तरी याचा कुठलाही लिखित करार झालेला नाही. त्यामुळे कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, असे हमासच्या प्रमुखाने धमकावले.

याह्या सिन्वर

इस्रायलबरोबर छेडलेला संघर्ष म्हणजे येत्या काळातील युद्धाचा सराव होता, असे सांगून सिन्वर याने इस्रायलला लक्ष्य करण्यासाठी हमासकडे शेकडो रॉकेट्स असल्याचे जाहीर केले. इस्रायलविरोधातील या संघर्षासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात निधी असून या आघाडीवर इराणने सर्वात मोठे सहाय्य पुरविल्याचा दावा सिन्वर याने केला. तसेच अरब-इस्लामी देशांमधून तसेच जगभरातील आपल्या समर्थकांनी देखील मोठे आर्थिक सहाय्य पुरविल्याची माहिती सिन्वर याने दिली.

इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे विशेष नुकसान झाले नसल्याचा दावा हमासच्या प्रमुखाने केला. गाझापट्टीमध्ये हमासने भुयारीमार्गांचे 500 किलोमीटर लांबीचे जाळे तयार केले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये यातील फक्त पाच टक्के जाळेच नष्ट झाल्याचे सिन्वरने सांगितले. याशिवाय इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये हमासने अवघे 80 साथीदार गमावल्याचे सिन्वर याचे म्हणणे आहे. तर आपल्या हवाई हल्ल्यांमध्ये हमासचे 225 दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला होता.

सध्या संघर्षबंदी झाली असली तरी कुठल्याही क्षणी इस्रायल व हमासमध्ये संघर्ष भडकू शकतो, हे सिन्वर याच्या जहाल व चिथावणीखोर विधानांमुळे समोर येत आहे. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने आपला प्रभाव वापरून सध्या ही संघर्षबंदी घडवून आणली खरी. पण हमासच्या नेत्यांनी ही संघर्षबंदी फार काळ टिकणार नाही, असा संदेश सार्‍या जगाला दिलेला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info