जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या ५० लाखांवर

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या ५० लाखांवर गेली आहे. अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने ही माहिती जाहीर केली. सर्वाधिक सुमारे साडेसात लाख बळी अमेरिकेत गेले असून त्यानंतर ब्राझिल व भारताचा क्रमांक लागतो. काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा नवा ‘व्हेरिअंट’ समोर आला असून युरोपातील बळींची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी चीनमध्येही कोरोनाचा नवा उद्रेक झाला असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक यंत्रणांना अद्याप यश मिळालेले नाही.

५० लाखांवर

अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बळींची संख्या ५० लाख, १ हजार, ९३२वर गेली आहे. सर्वाधिक ७ लाख, ४५ हजार, ८३७ बळी अमेरिकेत गेले असून, त्यापाठोपाठ ब्राझिलमध्ये ६ लाख, ७ हजार, ८२४ जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर भारत, मेक्सिको व पेरु या देशांचा समावेश असून जगातील १३ देशांमध्ये एक लाखांहून अधिक जण साथीत दगावल्याचे समोर आले आहे. तर जगातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २४ कोटी, ६८ लाखांवर गेली आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत ५० लाख बळींची नोंद होणे ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे. जगात सर्वाधिक बळी घेणार्‍या रोगांच्या यादीत कोरोना तिसर्‍या क्रमांकावर असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. साथ सुरू झाल्यानंतर त्याचे ‘हॉटस्पॉट’ सातत्याने बदलत असून सध्या रशिया, युक्रेन यासह पूर्व युरोपातील देशांमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. रशियात गेले काही दिवस सातत्याने विक्रमी बळींची नोंद असल्याची माहितीही उघड झाली आहे.

२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात उडविलेला हाहाकार अद्यापही कायम आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर पहिले १० लाख बळी जाण्यासाठी जवळपास साडेनऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. मात्र आता उपलब्ध माहितीनुसार, गेल्या साडेतीन महिन्यात जवळपास १० लाख बळींची नोंद झाली आहे.

पूर्व युरोपबरोबरच आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील कोरोनाचे बळी जाण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी ‘डेल्टा व्हेरिअंट’चा नवा उपप्रकार समोर आला असून त्याचा फैलावही वाढत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या नव्या हॉटस्पॉटमागे अपुरे लसीकरण व निर्बंधांमधील शिथिलता ही प्रमुख कारणे असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. कोरोनाचे उगमस्थान असणार्‍या चीनमध्येही साथीचा नवा उद्रेक झाला आहे. राजधानी बीजिंगसह प्रमुख प्रांतांमध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने चिनी यंत्रणांसमोरील चिंता वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबरच चीन आपल्या देशातील कोरोनाच्या साथीबद्दलची माहिती दडवित असल्याचेही उघड होत आहे. चीनच्या या लपवाछपवीमुळे जाहीर केले जात आहे, त्यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला असू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते.

कोरोनाची निर्मिती चीननेच केल्याचा नव्या पुस्तकाचा दावा 

५० लाखांवर

लंडन – कोरोनाव्हायरसची निर्मिती चीननेच केली व त्याची साथ प्रयोगशाळेतून विषाणू ‘लीक’ झाल्याने पसरली, असा दावा नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. ब्रिटीश पत्रकार मॅट रिडले व कॅनडाच्या संशोधक अलिना चॅन यांनी लिहिलेल्या ‘व्हायरल: द सर्च फॉर द ओरिजिन ऑफ कोविड-१९’मध्ये चीनवर ठपका ठेवण्यात आला आहे.

या पुस्तकासाठी ‘ड्रॅस्टिक’ या गटाने दिलेली जमवलेली माहिती व ‘ओपन सोर्स इंटेलिजन्स’चा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कोरोनाचा उगम चीनमध्येच झाला असा खुलासा करणारे हे दुसरे पुस्तक आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियन पत्रकार शॅरी मार्क्सन यांनीही आपल्या पुस्तकातून, कोरोनाचा उगम चीनच्या वुहान लॅबमधून झाला अशी माहिती प्रसिद्ध केली होती.

 

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info