वॉशिंग्टन – ‘अंतराळ हे अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील क्षेत्र आहे. अमेरिकेविरोधात युद्ध छेडणारे देश पहिल्याच झटक्यात अमेरिकेला निष्प्रभ करण्यासाठी या क्षेत्रात निर्णायक हल्ला करतील. अंतराळात पुन्हा एकदा पर्ल हार्बरची पुनरावृत्ती होऊ शकते, याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे’, या शब्दात अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनी अंतराळयुद्धाबाबत इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी, चीन व रशियाने एकेकाळी शांततापूर्ण क्षेत्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अंतराळक्षेत्राचे रूपांतर युद्धभूमीत केले आहे असे बजावले होते.
गेल्या काही वर्षांत चीन व रशिया या दोन्ही देशांनी अंतराळक्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. मे महिन्यात चीनने आपल्या ‘स्पेस स्टेशन’साठी ‘लाँग मार्च 5बी’ हे रॉकेट अवकाशात सोडले होते. त्यापूर्वी चीनने ‘अँटी सॅटेलाईट मिसाईल्स’ विकसित केल्याची माहितीही समोर आली होती. चंद्रावर तसेच मंगळावर अंतराळवीर धाडण्याच्या मोहिमांनाही वेग देण्यात आला असून अंतराळात तळ उभारण्यासाठीही चीन हालचाली करीत आहे. जुलै महिन्यात रशियाने गुप्तपणे उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन खळबळ उडवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी अंतराळात ‘पर्ल हार्बर’ची पुनरावृत्ती होण्याबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
‘अंतराळातील उपग्रहांवर हल्ले झाल्यास अमेरिकेतील संपर्क, दळणवळण, कमांड व इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील यंत्रणा पूर्णपणे ठप्प होऊ शकतात. त्याचे परिणाम फार भयानक असतील. याची जाणीव असलेले देश अंतराळात थेट हल्ला चढवून अथवा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पर्ल हार्बर घडविण्याचा प्रयत्न करु शकतात’, असे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनी बजावले. अमेरिकेच्या संरक्षणदलांना या धोक्याची कल्पना असून त्यासाठी त्यांनी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, असेही जनरल मिले यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दोन वर्षात अमेरिकेची अंतराळातील सज्जता वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकी संरक्षणदलाची सहावी कमांड म्हणून ‘स्पेस फोर्स’ची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी 70 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. या स्पेस फोर्ससाठी हायपरसोनिक वेपन्स, डायरेक्टेड एनर्जी सिस्टिम व स्वयंचलित तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |