हिजबुल्लाहकडे संपूर्ण इस्रायलला लक्ष्य करणारी गायडेड क्षेपणास्त्रे – वर्षभरात क्षेपणास्त्रे दुप्पटीने वाढविल्याची हिजबुल्लाह प्रमुखाची घोषणा

हिजबुल्लाहकडे संपूर्ण इस्रायलला लक्ष्य करणारी गायडेड क्षेपणास्त्रे – वर्षभरात क्षेपणास्त्रे दुप्पटीने वाढविल्याची हिजबुल्लाह प्रमुखाची घोषणा

बैरूत – इस्रायलच्या कुठल्याही शहरावर अचूकतेने हल्ले चढविणारी गायडेड क्षेपणास्त्रे हिजबुल्लाहकडे आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत हिजबुल्लाहने या क्षेपणास्त्रांची संख्या दुप्पटीने वाढविली आहे, असा इशारा हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने दिला. या इशार्‍याबरोबर नसरल्लाने इराणचे लष्करी अधिकारी कासेम सुलेमानी यांच्या हत्येसाठी इस्रायल आणि सौदी अरेबियाने अमेरिकेला चिथावणी दिल्याचे नसरल्लाने म्हटले आहे. ‘आत्ताही अमेरिका, इस्रायल व सौदी मिळून माझ्या हत्येचा कट आखत आहेत’, असा आरोप नसरल्लाने केला. हिजबुल्लाहकडील गायडेड क्षेपणास्त्रांची दुप्पट झालेली संख्या या संघटनेवरील कारवाईला आमंत्रण देणारी ठरू शकते. गेल्या महिन्यात इराणमध्ये अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येनंतर हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला हा भूमिगत झाल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. काही माध्यमांनी तर हिजबुल्लाह प्रमुखाने इराणमध्ये आश्रय घेतल्याचेही म्हटले होते. पण रविवारी हिजबुल्लाहच्या प्रमुखाने बैरूतस्थित वृत्तवाहिनीला चार तासांची प्रदिर्घ मुलाखत दिली. यामध्ये नसरल्लाने आपली संघटना आधीपेक्षा अधिक शस्त्रसज्ज आणि सामर्थ्यशाली झाल्याचे नसरल्लाने सांगितले. हिजबुल्लाहच्या सामर्थ्याबाबत बरेच रहस्य असून इस्रायलला याबाबत फारशी माहिती नसल्याचे नसरल्लाने म्हटले आहे.

यासाठी दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाने हिजबुल्लाहकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेची माहिती दिली. इस्रायलकडून वारंवार लेबेनॉनच्या पूर्वेकडील बेका भागात असलेले हिजबुल्लाहचा कारखाना नष्ट करण्याचा इशारा दिला जातो. पण इस्रायलने तसे केले तर संपूर्ण इस्रायलवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्याची क्षमता आपल्याकडे आहे, असे नसरल्लाने जाहीर केले. इस्रायलच्या प्रत्येक शहरांवर अचूक हल्ला चढविणारी गायडेड क्षेपणास्त्रे हिजबुल्लाहने विकसित केल्याचा दावा नसरल्लाने केला. गेल्या वर्षी हिजबुल्लाहच्या साठ्यात जेवढी गायडेड क्षेपणास्त्रे होती, त्याहून दुप्पट संख्येने हिजबुल्लाह या क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याचे नसरल्ला म्हणाले.

यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखाने इस्रायलचा सूड घेण्याची धमकी दिली. हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर अली कामेल मोहसिन जवाद याच्यासह इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी, कतैब हिजबुल्लाह या इराणसंलग्न इराकी संघटनेचे प्रमुख अबू महदी अल-मोहानदीस यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, अशी धमकी नसरल्लाने दिली. यापैकी अली कामेल हा इस्रायलच्या सिरियातील हल्ल्यात ठार झाला होता. तर सुलेमानी आणि मोहानदीस यांना अमेरिकेने इराकमधील ड्रोन हल्ल्यात ठार केले होते. इस्रायल आणि सौदी अरेबियाने अमेरिकेला चिथावणी देऊन सुलेमानी आणि मोहानदीस यांची हत्या घडवून आणल्याचा ठपका नसरल्लाने ठेवला. ‘सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या दौर्‍यात माझ्या हत्येबाबतही अमेरिकी नेत्यांशी चर्चा केली होती. क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्या मागणीप्रमाणे अमेरिकेने देखील इस्रायलला हाताशी घेऊन माझ्या हत्येचा कट रचला आहे’, असा आरोप नसरल्लाने केला. पण या तिघांची ही इच्छा पूर्ण होणार नसल्याचे हिजबुल्लाहच्या प्रमुखाने या मुलाखतीत सांगितले. तर इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करणार्‍या युएई, बाहरिन, सुदान आणि मोरोक्को या अरब राजवटींकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. या देशांनी याआधी देखील पॅलेस्टिनींना तोंडघशी पाडल्याचा आरोप नसरल्लाने केला.

दरम्यान, इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देणार्‍या हिजबुल्लाहकडे हजारो क्षेपणास्त्रे असल्याचा दावा इस्रायलने याआधीच केला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र तळांची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडली होती. पण आता हिजबुल्लाहच इस्रायलवर हल्ल्याची व आपल्या क्षेपणास्त्र सज्जतेची माहिती उघड करून पाश्‍चिमात्य देशांच्या कारवाईला आमंत्रण देत असल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info