ऑस्ट्रेलियाला दहशतवादी हल्ल्यांचा मोठा धोका – ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा इशारा

ऑस्ट्रेलियाला दहशतवादी हल्ल्यांचा मोठा धोका – ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा इशारा

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाला दहशतवादी हल्ल्यांचा मोठा धोका संभवतो. एकांडे दहशतवादी किंवा दहशतवाद्यांचे पथक हे हल्ले घडवू शकतील, याची खात्रीलायक माहिती आपल्याकडे असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख माईक बर्गिस यांनी दिला. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियात परदेशी गुप्तचरांचे मोठे जाळे उद्ध्वस्त केल्याचा दावाही बर्गिस यांनी केला. याचे तपशील बर्गिस यांनी उघड केलेले नाहीत. पण चीन आपल्या देशात मोठ्या प्रमाणात हेरगिरी व हस्तक्षेप करीत असल्याचे गंभीर आरोप ऑस्ट्रेलियाच्या सरकारने याआधी केले होते.

‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन’चे संचालक माईक बर्गिस यांनी पत्रकारांशी बोलताना दहशतवादी हल्ल्यांचा इशारा दिला. ‘आयएस’पासून प्रभावित झालेले एकांडे दहशतवादी आणि पथक ऑस्ट्रेलियात हल्ले घडविण्याच्या तयारीत आहेत. हा एक गंभीर धोका असून दहशतवादी हल्ल्यांचा धोका इतक्यात टळणार नसल्याचेही बर्गिस म्हणाले. गेल्या काही महिन्यांमध्ये हा दहशतवादी हल्ल्यांचा धोका बळावल्याची माहिती ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी दिली.

या व्यतिरिक्त परदेशी गुप्तहेरांचा ऑस्ट्रेलियातील सुळसुळाट देखील देशाच्या सुरक्षेसाठी तितकाच धोकादायक असल्याची चिंता बर्गिस यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियन यंत्रणांनी डझनभर परदेशी हेरांची देशातून हकालपट्टी केली होती. अशा हेरांचा आपल्या देशातील हस्तक्षेप वाढत आहे. सरकारी यंत्रणांबरोबर ऑस्ट्रेलियाच्या प्रांतीय आणि स्थानिक संघटनांमध्ये देखील या हेरांच्या कारवाया सुरू असल्याचे बर्गिस म्हणाले.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेने अशा परदेशी हेरांचे जाळे उद्ध्वस्त केले होते, अशी माहिती बर्गिस यांनी दिली. या हेरांचे ऑस्ट्रेलियाचे माजी राजकीय नेते, दूतावास आणि स्थानिक पोलिसांशी संबंध होते, असे बर्गिस यांनी सांगितले. या हेरांनी चलाखीने ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या सुरक्षाविषयक धोरणांमध्ये हस्तक्षेप केला होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण तंत्रज्ञानाबाबत संवेदनशील माहिती हस्तगत केली होती, असा आरोप बर्गिस यांनी केला. पुढे ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेने तपास करून या परदेशी हेरांना शांतपणे देशातून बाहेर काढले, अशी माहिती बर्गिस यांनी दिली.

यावेळी बर्गिस यांनी कुठल्याही देशाचा थेट उल्लेख करण्याचे टाळले. पण चीनचे हेर व हस्तक ऑस्ट्रेलियाच्या सरकारी तसेच विद्यापीठांमध्ये घुसल्याची माहिती याआधी उघड झाली होती. ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये देखील चीनच्या प्रभावाखाली?असलेल्या व्यक्ती असल्याचा आरोप झाला होता.

English  हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info