अमेरिका व दक्षिण कोरियाच्या संयुक्त युद्धसरावावरून उत्तर कोरियाचा इशारा

संयुक्त युद्धसराव

प्योनग्यँग/सेऊल – दक्षिण कोरिया चिथावणी देणारा युद्धसराव करतो की एखादा धाडसी निर्णय घेतो, यावर उत्तर कोरियाचे सरकार व लष्कर बारीक लक्ष ठेऊन आहे, असा इशारा उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँग यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर व दक्षिण कोरियाने दोन देशांमधील संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बैठक होण्याचे संकेतही देण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर किम यो जाँग यांनी यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तर कोरियाने दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी स्थापन केलेले राजनैतिक कार्यालय बॉम्बस्फोटात उडवून दिले होते. त्यानंतर उत्तर कोरियाने दोन देशांमधील संपर्क तोडून लष्करी व आण्विक हालचालींना वेग दिला होता. गेल्या काही महिन्यात उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांनी चीनबरोबरील सहकार्य अधिक वाढविण्याचे प्रयत्नही सुरू केले होते. या सर्व हालचाली दक्षिण कोरिया व अमेरिकेवर दडपण आणण्यासाठी असल्याचे सांगण्यात येते.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/north-korea-warns-of-joint-us-south-korean-war-games/