युक्रेनला दीर्घकाळापर्यंत शस्त्रपुरवठा करण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली

शस्त्रपुरवठा

वॉशिंग्टन/किव्ह – रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळपर्यंत चालू रहावे, यासाठी अमेरिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने देशातील आघाडीच्या शस्त्रनिर्मिती कंपन्यांची बैठक बोलावली आहे. अमेरिकेच्या उपसंरक्षणमंत्री कॅथलिन हिक्स यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात युक्रेनला अविरत शस्त्रपुरवठा सुरु रहावा, यासाठी अमेरिकी कंपन्यांना उत्पादनात वाढ करण्याचे तसेच त्याला वेग देण्याचे निर्देश देण्यात येतील, असा दावा सूत्रांनी केला. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन युक्रेनला ७५ कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षणसहाय्याची घोषणा करणार असल्याची माहिती अमेरिकी माध्यमांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसात रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतांवर संपूर्ण ताबा मिळविण्यासाठी नव्याने लष्करी मोहिमेची आखणी केल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी आग्नेय युक्रेनमधील मारिपोलवर संपूर्ण ताबा मिळविण्याची कारवाईही अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही मोहिमा यशस्वी ठरल्यास रशिया पुन्हा राजधानी किव्ह व नजिकच्या भागांवर हल्ला चढवेल, असे इशारे देण्यात येत आहेत. रशिया युक्रेन युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व ब्रिटनने युक्रेनला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहाय्य पुरविण्याची तयारी सुरू केली आहे.

शस्त्रपुरवठा

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बुधवारी आयोजित केलेली बैठक त्याचाच भाग मानण्यात येतो. या बैठकीत ‘लॉकहीड मार्टिन’, ‘रेथॉन’, ‘बोईंग’, ‘नॉथ्रॉप ग्रुमन’, ‘जनरल डायनॅमिक्स’ यासारख्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेकडून गेल्या वर्षभरात युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करण्यात आला आहे. त्यात ‘जॅवलिन’ रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, विमानभेदी स्टिंगर मिसाईल्स, सशस्त्र वाहने, ड्रोन्स, तोफा, रायफल्स यांचा समावेश आहे. पुढील दोन वर्षे हा पुरवठा कायम ठेवण्याची अमेरिकेची योजना असून त्यासाठी शस्त्रास्त्रकंपन्यांना योग्य निर्देश देण्यात येतील, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

संरक्षण विभागाकडून शस्त्रास्त्र कंपन्यांची बैठक आयोजित होत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन युक्रेनला ७५ कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षणसहाय्याची घोषणा करणार आहेत. अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. व्हाईट हाऊसच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात, नव्या संरक्षणसहाय्यात ड्रोन्स, रणगाडे व हेलिकॉप्टर्सचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

शस्त्रपुरवठा

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने युक्रेनला १.७ अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविले आहे. यात पाच हजारांहून अधिक जॅवलिन मिसाईल्स व दीड हजारांहून अधिक स्टिंगर्सचा समावेश आहे. बायडेन यांच्या नव्या घोषणेनंतर हे सहाय्य जवळपास अडीच अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल, असे सांगण्यात येते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की सातत्याने मोठ्या शस्त्रपुरवठ्याची मागणी करीत असून ती पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने सर्वाधिक पुढाकार घेतल्याचे नव्या घडामोडींवरून दिसून येते. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननेही संरक्षणसहाय्य वाढविण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. येत्या काही दिवसात युक्रेनी जवानांची एक तुकडी ब्रिटनमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, रशियाने पूर्व युक्रेनच्या भागांवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. त्याचवेळी मारिपोल शहरावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारी युक्रेनी लष्कराच्या एक हजारांहून अधिक जवानांना मारिपोलमधून ताब्यात घेतल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र युक्रेनने हे वृत्त फेटाळले आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info