निआमे – नायजरच्या तिलाबेरी भागात झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये ८० जणांचा बळी गेला असून २०हून अधिक जण जखमी झाले आहेत. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली तरी ‘बोको हराम’ किंवा ‘आयएस’संलग्न गटाने हल्ला चढविल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. गेल्याच महिन्यात ‘बोको हराम’ने दिफा भागात केलेल्या हल्ल्यानंतर हा अखेरचा हल्ला नसून अजून हल्ले चढविले जातील, अशी धमकी दिली होती.
‘झारोमदारेय’ व ‘तकोम्बान्गोउ’ या दोन गावांमध्ये एकापाठोपाठ एक दहशतवादी हल्ले झाल्याची माहिती नायजरचे अंतर्गत सुरक्षामंत्री अल्काचे अल्हादा यांनी दिली. नायजरमध्ये गेल्याच आठवड्यात राष्ट्राध्यक्ष व संसदीय निवडणुकांसाठी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती. असे असतानाही हल्ले झाल्याने सुरक्षायंत्रणा निष्प्रभ झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
मालीच्या सीमेला जोडून असलेल्या नायजरच्या दक्षिण भागातील ‘तकोम्बान्गोउ’मध्ये झालेल्या हल्ल्यात ५० जणांचा बळी गेला असून १७ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यापाठोपाठ ‘झारोमदारेय’ गावातील हल्ल्यात ३० जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. दोन्ही हल्ले एकाच दहशतवादी संघटनेने चढविले असावे, असा दावा सुरक्षायंत्रणांकडून करण्यात आला आहे. हल्लेखोर मालीतून नायजरमध्ये आले असावे, असे स्थानिक अधिकार्यांनी म्हटले आहे.
हल्ल्यानंतर तिलाबेरी भागात लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या असून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या भागातील गावकर्यांनी दोन संशयित दहशतवाद्यांना मारले होते. त्याचा सूड उगविण्यासाठी भीषण हल्ले चढविण्यात आले असावेत, अशी माहिती अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी दिली आहे. नायजरमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देण्यासाठी हल्ले चढविण्यात आले असावेत, असा दावाही करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने दिफामध्ये केलेल्या भीषण हल्ल्यात २८ जणांचा बळी गेला होता व १०० हून अधिक जखमी झाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी तब्बल ८०० घरांना आगीही लावल्या होत्या. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात झालेला मोठा दहशतवादी हल्ला देशातील सुरक्षायंत्रणांचे अपयश दाखवून देणारा ठरतो.
आफ्रिकेतील नायजर, माली, बुर्किना फासो, चाड व मॉरिशानिया या देशांना ‘साहेल कंट्रीज्’ म्हणून ओळखले जाते. या साहेल क्षेत्रात गेल्या काही वर्षात दहशतवादी संघटनांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. ‘अल कायदा’ व ‘आयएस’ या दोन्ही संघटनांशी निगडित गट आपले वर्चस्व राखण्यासाठी सातत्याने हल्ले चढवित आहेत. अमेरिका व फ्रान्ससह युरोपिय देशांनी दहशतवादविरोधी मोहीम राबविली असली तरी त्याला अपेक्षित यश मिळाले नसून, दहशतवादी संघटना अधिक प्रबळ होत असल्याचे नव्या हल्ल्यांवरून दिसून येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |