वॉशिंग्टन/तैपेई – अमेरिका व तैवानमधील राजनैतिक सहकार्यावर टाकण्यात आलेले निर्बंध अमेरिकेकडून मागे घेण्यात आले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ही घोषणा केली. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने आपल्या संयुक्त राष्ट्रसंघटनेतील दूत तैवानला भेट देतील, असे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ झालेली ही घोषणा तैवानच्या मुद्यावर चीनला दिलेला दुसरा मोठा धक्का ठरला आहे. पॉम्पिओ यांच्या घोषणेवर चीनने अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी चिनी प्रसारमाध्यमांनी अमेरिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
‘सुदृढ लोकशाही व अमेरिकेचा विश्वासार्ह भागीदार ही ओळख असलेल्या तैवानवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यापूर्वी अनेक गुंतागुंतीचे निर्बंध लादले होते. अमेरिकेच्या राजनैतिक, लष्करी व प्रशासकीय अधिकार्यांचे तैवानशी असलेले संबंध नियंत्रित करण्यात आले होते. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीला खुश करण्यासाठी अमेरिकेने हे एकतर्फी निर्णय घेतले होते. मात्र आता यापुढे हे नियंत्रण असणार नाही’, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी तैवानवरील राजनैतिक निर्बंध उठविल्याची घोषणा केली. अमेरिका-तैवान संबंधामध्ये परराष्ट्र विभागाने यापूर्वी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे रद्दबातल करण्यात येत असल्याचेही परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले.
गेल्या ७२ तासात अमेरिकेने तैवानच्या मुद्यावर चीनला दिलेला हा दुसरा मोठा धक्का ठरतो. गुरुवारी अमेरिकेच्या ‘युएन मिशन’ने दूत केली क्राफ्ट पुढील आठवड्यात तैवानचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्या दौर्यात, अमेरिकी दूत तैवानच्या वरिष्ठ नेत्यांची व अधिकार्यांची भेट घेतील तसेच द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील, असेही सांगण्यात आले. अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्यांनी तैवानचा अधिकृत दौरा करण्याची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी वेळ आहे. क्राफ्ट यांच्यापूर्वी अमेरिकेचे आरोग्यमंत्री अलेक्स अझार व परराष्ट्र विभागाचे अधिकारी केथ क्रॅक यांनी तैवानला भेट दिली होती.
दोन महिन्यांपूर्वी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, तैवान हा चीनचा भाग नाही असे वक्तव्य करून खळबळ उडविली होती. पॉम्पिओ यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेने चीनची ‘वन चायना पॉलिसी’ उघडपणे धुडकावल्याचे चित्र समोर आले होते. परराष्ट्रमंत्र्यांच्या या वक्तव्यापूर्वीही अमेरिका तैवानच्या मुद्यावर आक्रमक झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबरोबरील सहकार्याच्या मुद्द्यावर अधिक सक्रीय भूमिका घेतली होती.
अमेरिकेने तैवानमध्ये सुरू केलेले राजनैतिक कार्यालय, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी घेतलेली तैवानच्या नेत्यांची भेट आणि वाढते संरक्षण सहकार्य या गोष्टी ट्रम्प यांच्या भूमिकेचा भाग मानल्या जातात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, तब्बल तीन दशकांच्या कालावधीनंतर तैवानला लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. अमेरिकेने तैवाननजिकच्या सागरी क्षेत्रातील तैनातीही वाढविली असून विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका, ड्रोन्स, टेहळणी विमाने व लढाऊ विमाने यांचा वावर वाढविला होता. गेल्याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘तैवान अॅश्युरन्स अॅक्ट’वर स्वाक्षरीही केली होती.
अमेरिकेकडून एकापाठोपाठ घेण्यात येणार्या या निर्णयांमुळे चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट चांगलीच बिथरली आहे. तैवानचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी त्यावर थेट आक्रमण करून ताबा मिळवावा, असे आक्रमक सल्ले चीनच्या लष्करी अधिकार्यांकडून दिले जात आहेत. त्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणात संरक्षण तैनाती केल्याचेही समोर आले आहे. तैवान युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येते.. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने तैवान मुद्यावरून चीनविरोधात सुरू केलेल्या राजनैतिक संघर्षाची धार अधिकच वाढविल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |