बायडेन प्रशासनाने चीनची ‘रेड लाईन’ ओलांडू नये – कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांचा इशारा

बायडेन प्रशासनाने चीनची ‘रेड लाईन’ ओलांडू नये – कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांचा इशारा

बीजिंग/वॉशिंग्टन – हाँगकाँग, तिबेट तसेच झिंजिआंगमधील व्यवहार चीनच्या राजवटीसाठी ‘रेड लाईन’ आहे, याची जाणीव ठेऊन अमेरिकेने ते ओलांडण्याची हिंमत करु नये, असा खरमरीत इशारा कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांनी दिला. त्याचवेळी अमेरिकेतील प्रशासनाने चिनी कंपन्या, प्रसारमाध्यमे, शिक्षणसंस्था व विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवावे, असेही जिएची यांनी बजावले आहे. बायडेन प्रशासनाला चीनकडून इशारे मिळत असतानाच, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ही लोकशाहीवादी जगासमोरची सर्वात गंभीर समस्या असून अमेरिकेतील नव्या प्रशासनाने त्यांनाच लक्ष्य करावे, असा सल्ला आघाडीच्या अभ्यासगटाने दिला आहे.

ज्यो बायडेन यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. बायडेन व डेमोक्रॅटिक पक्षाची चीनबाबतची भूमिका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा सौम्य असेल, असे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, चीन पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्याची तयारी करीत असल्याचे जिएची यांच्या इशार्‍यावरून दिसून येते. अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांना सुनावतानाच चिनी नेत्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ट्रम्प यांच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेले नुकसान भरून काढण्याची जबाबदारी नव्या प्रशासनावर असल्याचेही चिनी नेत्यांनी बजावले.

‘महासत्तांमधील वैर आणि दुसर्‍याचे नुकसान करून आपला फायदा होईल या कालबाह्य मानसिकतेतून अमेरिकेने बाहेर पडावे. यापुढील काळात अमेरिका चीनबरोबरील आपले संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी चीनला आशा आहे. अमेरिकन प्रशासनाने चीनच्या विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवावे. चीनची प्रसारमाध्यमे, शिक्षणसंस्था व कंपन्यांवर दबाव टाकणे बंद करावे. त्याचवेळी हाँगकाँग, तिबेट व झिंजिआंगमधील व्यवहार ही रेड लाईन असून ती ओलांडण्याची हिंमत करु नये’, या शब्दात जिएची यांनी बायडेन प्रशासनाला सुनावले.

जिएची हे चीनचे माजी परराष्ट्रमंत्री असून सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीतील सर्वात शक्तिशाली यंत्रणा असणार्‍या ‘पॉलिटब्युरो’चे वरिष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. गेल्या महिन्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनीदेखील अमेरिकेच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले होते. ‘अमेरिकेने चीनला दडपण्याचे व नवे शीतयुद्ध सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे दोन्ही बाजूंचे संबंध दुखावण्याबरोबरच जगातही मोठ्या उलथापालथी झाल्या’, असा ठपका यी यांनी ठेवला होता.

दरम्यान, अमेरिकेतील आघाडीचा अभ्यासगट ‘अटलांटिक कौन्सिल’ने चीनसंदर्भात नवा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात कम्युनिस्ट पार्टी व चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांना लक्ष्य करण्यात आले आहे. ‘द लाँगर टेलिग्राम’ असे या अहवालाचे नाव असून, त्यात जिनपिंग केवळ अमेरिकेसमोरील प्राधान्यक्रम नसून संपूर्ण लोकशाहीवादी जगासमोरील सर्वात गंभीर समस्या आहे, असे बजावण्यात आले आहे. अमेरिकेतील नव्या प्रशासनाने चीनसंदर्भातील धोरण राबविताना जिनपिंग व त्यांच्या निकटवर्तियांवर कारवाई करण्यास प्राधान्य द्यावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info