अमेरिकेत आढळलेला ‘स्पाय बलून’ चीनच्या व्यापक हेरगिरी मोहिमेचा भाग

- अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेत आढळलेला चिनी ‘स्पाय बलून’ हा चीनकडून जागतिक स्तरावर चालविण्यात येणाऱ्या व्यापक हेरगिरी मोहिमेचा भाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. चीनच्या हैनान प्रांतात असलेल्या एका तळावरून ही मोहीम चालविण्यात येत असून आतापर्यंत जवळपास 12 देशांमध्ये चीनने अशा प्रकारे ‘स्पाय बलून’च्या माध्यमातून हेरगिरी केली असल्याचा आरोप अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी केला. चीनने या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले असून अमेरिका खोटी माहिती देत प्रचारयुद्ध खेळत असल्याचे म्हटले आहे.

‘स्पाय बलून’

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अलास्का प्रांतानजिकच्या हद्दीतून चीनच्या स्पाय बलूनने अमेरिकेत घुसखोरी केली होती. त्यानंतर कॅनडाच्या हद्दीत काही काळ टेहळणी करून अमेरिकेच्या इदाहो प्रांतात व मोंटानामध्ये घुसखोरी केल्याचे आढळले होते. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या ‘एफ-22’ रॅप्टर लढाऊ विमानाने सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर करून चीनचा ‘स्पाय बलून’ उडवून दिला होता. त्याचे अवशेष गोळा करण्याची मोहीम अजूनही सुरू आहे. मात्र त्याचवेळी या घटनेवरून अमेरिका व चीनमधील तणाव टोकाला पोहोचला असून दोन देशांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष पेटला आहे.

‘स्पाय बलून’

दोन दिवसांपूर्वीच अमेरिकी माध्यमांनी यापूर्वीही चीनने अमेरिकेच्या हद्दीत ‘स्पाय बलून्स’ धाडल्याची माहिती उघड केली होती. त्यानंतर अमेरिकी यंत्रणा पुढे सरसावल्या असून फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरात चीनने अशा प्रकारची व्यापक हेरगिरी मोहीम राबविल्याचा दावा केला. अमेरिकेसह जगातील जवळपास 12 देशांमध्ये चीनने अशा प्रकारे ‘स्पाय बलून्स’ धाडून हेरगिरी केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनीही त्याला दुजोरा दिला. ‘अमेरिका हा एकटाच चीनच्या मोहिमेचे लक्ष्य ठरलेला नाही. जगातील पाच खंडांमधील देश चीनच्या मोहिमेचे लक्ष्य ठरले’, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी सांगितले. अमेरिकी अधिकाऱ्यांनी संबंधित देशांना याची कल्पना दिल्याचेही परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले.

‘स्पाय बलून’

चीनच्या हैनान प्रांतात असलेल्या एका तळावरून ‘स्पाय बलून’ सोडण्यात येत असून त्यात लष्करी स्वरुपाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, असेही अमेरिकी यंत्रणांकडून सांगण्यात आले. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने गेल्या दशकापासून पृथ्वी व अंतराळ यात असणाऱ्या ‘निअर स्पेस’ क्षेत्रातील हालचाली वाढविण्यावर भर दिला होता. यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान व सुविधाही विकसित करण्यास सुरुवात झाली होती. ‘स्पाय बलून’ त्याचाच भाग असून गेल्या दशकापासून चीनने त्याचा वापर वाढविल्याचे समोर येत आहे. अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार जपान, तैवान, फिलिपाईन्स, भारत, कॅनडा यासारख्या देशांमध्येही चीनने याचा वापर केला आहे.

अमेरिकेकडून जाहीर करण्यात येत असलेल्या दाव्यांवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेचे दावे म्हणजे प्रचारयुद्धाचा भाग असल्याची टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने देशातील संरक्षणतळ व संरक्षण विभागांशी निगडीत इमारतींबाहेर असलेले चिनी ‘सर्व्हिलन्स कॅमेरे’ हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेची बाब ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात येत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ऑस्ट्रेलियन सरकारचा भाग असलेल्या जवळपास 250 हून अधिक इमारतींनजिक 900हून अधिक चिनी सर्व्हिलन्स कॅमेरे बसविण्यात आल्याचे एका पाहणीत आढळले होते. यापूर्वी अमेरिका व ब्रिटन या देशांनीही चिनी कंपन्यांचे सर्व्हिलन्स कॅमेर हटविण्याचा निर्णय घेतला होता.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info