वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकी नौदलातील ‘न्यूक्लिअर सुपरकॅरिअर’ असणारी ‘युएसएस निमित्झ’ इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दाखल झाली आहे. गेले काही महिने ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’च्या नेतृत्त्वाखाली आखाती क्षेत्रात तैनात करण्यात आली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला ‘युएसएस निमित्झ’सह कॅरिअर ग्रुपला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात धाडण्यात आले असून अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी हे आदेश दिल्याचे सांगण्यात येते. ‘युएसएस निमित्झ’ इंडो-पॅसिफिकमध्ये दाखल होत असतानाच अमेरिकेची विनाशिका ‘युएसएस जॉन एस. मॅक्कॅन’ने गुरुवारी तैवानच्या सामुद्रधुनीतून प्रवास केल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे इंडो-पॅसिफिकमधील सध्याचे धोरण कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन तसेच संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी संसदेसमोर झालेल्या सुनावणीत यासंदर्भात ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर, चीनने ‘साऊथ चायना सी’सह पॅसिफिक क्षेत्रात पुन्हा एकदा आक्रमक लष्करी हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या १५ दिवसात चीनच्या लढाऊ विमानांनी दोनदा तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली असून युद्धसरावाचेही आयोजन केले होते. तैवानच्या स्वातंत्र्याचे प्रयत्न म्हणजे युद्धाची धमकी असल्याचे चीनने बजावले होते.
चीनच्या या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनेही इंडो-पॅसिफिकमध्ये आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेच्या पॅसिफिक तळाचा भाग असलेली ‘युएसएस थिओडोर रुझवेल्ट’ साऊथ चायना सीमध्ये तैनात करण्यात आली होती. अमेरिकेची लष्करी तसेच दीर्घ पल्ल्याची टेहळणी विमाने या क्षेत्रात सातत्याने घिरट्या घालत आहेत. त्यापाठोपाठ गुरुवारी अमेरिकेची प्रगत विनाशिका ‘युएसएस जॉन मॅक्कॅन’ने तैवानच्या सामुद्रधुनीतून प्रवास केल्याचेही समोर आले आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने आपल्या तीन अजस्त्र विमानवाहू युद्धनौका एकाच वेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तैनात करून चीनवरील दडपण वाढविले होते. अमेरिकेच्या या कृतीने बिथरलेल्या चीनने युद्धाच्या धमक्या देण्यास सुरुवात करून त्यासाठी अमेरिकाच कारणीभूत ठरेल, असे बजावले होते. काही दिवसांपूर्वीच चीनचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांनी, अमेरिकेने ‘रेड लाईन’ ओलांडून नये, असा इशाराही दिला होता. मात्र चीनच्या या धमक्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने या क्षेत्रातील आपली संरक्षणसज्जता कायम ठेवण्याचे संकेत दिले असून ‘युएसएस निमित्झ’ दाखल होणे त्याचाच भाग दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |