चीनच्या शस्त्रसज्ज गस्तीनौकांची जपानच्या सागरीक्षेत्रात घुसखोरी

चीनच्या शस्त्रसज्ज गस्तीनौकांची जपानच्या सागरीक्षेत्रात घुसखोरी

टोकिओ – रॉकेट्सनी सज्ज असलेल्या चिनी तटरक्षक दलाच्या चार गस्तीनौकांनी जपानच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली. काही दिवसांपूर्वी चीनने आपल्या तटरक्षकदलाला परदेशी जहाजांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले होते. त्यानंतर पहिल्यांदाच चीनच्या गस्तीनौकांनी जपानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. ही घुसखोरी आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी असल्याचे जपानने बजावले आहे.

सोमवारी चीनच्या चार गस्तीनौकांनी जपानच्या सेंकाकू द्विपसमुहाच्या क्षेत्रात प्रवेश केला. यापैकी दोन गस्तीनौका बर्‍याच काळापर्यंत जपानच्या सागरी हद्दीत होत्या. तर दोन गस्तीनौकांनी या सागरी क्षेत्रातून माघार घेतली. पण मंगळवारी पहाटे ४.१५ मिनिटांनी पुन्हा चीनच्या दोन गस्तीनौकांनी जपानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली. यावेळी या सागरी क्षेत्रात मासेमारी करणार्‍या जपानच्या मच्छिमार नौकेच्या दिशेने चीनच्या या गस्तीनौकांनी धोकादायकरित्या प्रवास केला.

जपानच्या गस्तीनौका आपल्या मच्छिमार नौकेच्या रक्षणासाठी पुढे सरसावल्याने अनर्थ टळला, असे जपानच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे. चीनच्या गस्तीनौकांपैकी दोन गस्तीनौकांवर रॉकेट्सनी सज्ज असलेल्या तोफा होत्या, अशी माहिती जपानच्या तटरक्षक दलाने दिली. पहिल्यांदाच चीनच्या गस्तीनौका रॉकेट्सनी सज्ज असल्याचे पाहण्यात आल्याचे जपानचे म्हणणे आहे.

जपानच्या

पुढे मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चीनच्या गस्तीनौकांनी सेंकाकूच्या सागरी क्षेत्रातून माघार घेतली. पण तोपर्यंत या क्षेत्रात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. जपानचे पंतप्रधआन सुगा सरकारने चीनच्या तटरक्षक दलांच्या गस्तीनौकांनी केलेल्या घुसखोरीवर संताप व्यक्त केला आहे. तसेच चीनच्या गस्तीनौकांची ही घुसखोरी आणि जपानच्या मच्छिमार नौकेच्या दिशेने केलेला प्रवास अजिबात खपवून घेणार नसल्याचे जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव कात्सुनोबू कातो यांनी बजावले.

काही दिवसांपूर्वीच चीनने आपल्या तटरक्षक दलाच्या अधिकारांमध्ये वाढ केली आहे. ‘ईस्ट तसेच साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात परदेशी जहाजांची घुसखोरी आढळल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश चीनने आपल्या तटरक्षक दलाला दिले आहेत. यामध्ये ‘ईस्ट चायना सी’च्या सेंकाकू द्विपसमुहाच्या सागरी क्षेत्राचाही समावेश आहे.

सेंकाकू या द्विपसमुहावर आपलाच अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. तर या बेटांवर आपला अधिकार असल्याचे जपानचे म्हणणे आहे. चीनच्या आक्रमकतेपासून आपल्या बेटांच्या सुरक्षेसाठी जपानने स्वतंत्र नौदल पथक उभारण्याची तयारीही केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info