रशिया युक्रेनचे दोन तुकडे करण्याच्या तयारीत

- युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागाचा आरोप

किव्ह – युक्रेनवरील लष्करी कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा रशियाने केली होती. त्याला एक दिवस उलटत नाही तोच, रशिया आपल्या देशाचे दोन तुकडे करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी केला. सध्या रशियाकडे ताबा असलेल्या युक्रेनच्या लुहान्स भागातील रशियासमर्थक नेत्याने हा भूभाग रशियाशी जोडायचा का? यावर सार्वमत घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागाने व्यक्त केलेली भिती प्रत्यक्षात उतरू लागल्याचे संकेत मिळत आहेत.

रविवारी युक्रेनच्या खारकिव्ह शहरातील अणुप्रकल्पावर रशियाने घणाघाती हवाई हल्ले चढविले. याच्या एक दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भेट दिलेल्या पोलंडच्या सीमाभागाजवळील युक्रेनच्या शहरावर रशियाने जबरदस्त हल्ले चढविले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीचे दडपण रशियावर येऊ शकत नाही, हा इशारा याद्वारे रशियाने दिला होता. त्यानंतर खारकिव्हवरील हल्ला रशिया आक्रमकता सोडण्यास तयार नसल्याचे दाखवून देत आहे. याआधी युक्रेनी लष्कराची ठिकाणे लक्ष्य करून रशियाने या देशाचा प्रतिकार मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, युक्रेनवरील लष्करी कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे जाहीर करून रशियाने सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता रशिया युक्रेनमधून माघार घेईल का, अशी चर्चा यामुळे सुरू झाली होती. पण रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी हे युद्ध संपण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा सामरिक विश्‍लेषक देत आहेत. तर युक्रेनचा हवा असलेला भूभाग ताब्यात घेतल्यानंतरच रशिया हे युद्ध थांबविल, असा दावा काही सामरिक विश्‍लेषकांनी केला आहे.

कोरियन क्षेत्राचे जसे उत्तर व दक्षिण असे दोन भाग असून याचे दोन देशांमध्ये रुपांतर झाले आहे. त्याच धर्तीवर रशिया युक्रेनचे दोन भाग करील व त्यातला एक भाग रशिया युक्रेनपासून तोडून टाकणार असल्याचे युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख किरिलोव्ह बुडानोव्ह यांनी केला. आपल्या ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या भूभागाचा आपल्या अधिपत्याखालील देश म्हणून वापर करण्याचा रशियाचा हेतू आहे. याद्वारे युक्रेनच्याच दोन भागांमध्ये संघर्ष पेटवून देण्याची भयंकर योजना रशियाने आखलेली असल्याचे बुडानोव्ह यांनी म्हटले आहे.

मात्र रशिया या योजनेवर काम करीत असताना, युक्रेनच्या प्रतिकाराचे स्वरुप यामुळे पूर्णपणे बदलेल. युक्रेनची जनता गोरिला युद्धतंत्राचा वापर करून रशियाला प्रत्युत्तर देईल, असा दावा किरिलोव्ह बुडानोव्ह यांनी केला. युक्रेनकडून अशा स्वरुपाचे आरोप होत असताना, रशिया मात्र युक्रेनमध्ये आपल्या विरोधात कंत्राटी जवान लढत असल्याचे आरोप करीत आहे. या जवानांमध्ये अल कायदा, आयएस तसेच इतर दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे रशियाने म्हटले होते. यासाठीच अमेरिका व पाश्‍चिमात्य देश युक्रेनी जनतेनेच आता रशियाच्या विरोधात शस्त्रे हाती घेतल्याचे दावे करीत आहेत, असे रशियासमर्थक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात युक्रेनची जनता नाही, तर त्याच्या आड कंत्राटी जवानांचा रशियाविरोधात वापर केला जात असल्याची टीका या विश्‍लेषकांकडून केली जात आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info