मॉस्को/ब्रुसेल्स/वॉशिंग्टन – अमेरिकेचे बायडेन प्रशासन नाटोबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच राष्ट्राध्यक्ष बायडेन नाटोच्या प्रमुखांशी रशियाच्या धोक्याबाबत चर्चा करणार आहेत. बायडेन प्रशासन आणि नाटोमध्ये प्रस्थापित होणार्या या सहकार्यावर रशियाने संताप व्यक्त केला आहे. तसेच रशियावर दडपण वाढविण्याचे धोरण अमेरिकेने वेळीच सोडले नाही, तर रशिया देखील याला प्रत्युत्तर देणारी पावले उचलेल, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नाटो’ ही संघटना आर्थिक व लष्करीदृष्ट्या अमेरिकेवर भार ठरत असल्याची टीका केली होती. युरोपिय देशांचा या संघटनेतील सहभाग अमेरिकेच्या तुलनेत कमी असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला होता. यामुळे अमेरिका आणि नाटोतील सहकार्यात तणाव निर्माण झाला होता. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नाटोबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
या आठवड्यात अमेरिका व नाटो सदस्य देशांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रशियाकडून असलेल्या धोक्यावर चर्चा होणार आहे. तसेच रशियाच्या पश्चिम सीमेजवळील देशांमध्ये सैन्याच्या तैनातीबाबतही नाटोच्या या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. अमेरिका आणि नाटोतील सदर सहकार्य आपल्यावर दडपण वाढविण्याचा प्रकार असल्याची टीका रशियाने केली आहे. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी अमेरिका व नाटोला बजावले.
काही दिवसांपूर्वीच रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेबरोबर चर्चा करून उभय देशांमधील वाद राजनैतिक स्तरावर सोडविण्याची तयारी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर, ‘अमेरिका आणि नाटोबरोबरचे सहकार्य सुधारण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला होता. यासाठी रशियाने आपले दरवाजेही उघडले होते. पण आपले दरवाजे कायमस्वरुपी उघडे नसतील, हे अमेरिका आणि नाटो सदस्य देशांनी ध्यानात ठेवावे’, याची आठवण रिब्कोव्ह यांनी करुन दिली.
तसेच अमेरिकेने रशियाबाबतच्या आपल्या धोरणात बदल करावे, असे आवाहन रिब्कोव्ह यांनी केले. ‘अमेरिका आणि नाटोने रशियावर दडपण वाढविण्याचे धोरण कायम ठेवले तर रशिया प्रत्युत्तर देणारी पावले उचलेल. यासाठी रशिया कुणाच्याही निर्बंधांचीही पर्वा करणार नाही’, असा इशारा रिब्कोव्ह यांनी दिला.
त्याचबरोबर, ‘अमेरिकेच्या हुकूमशाही, एकाधिकारशाहीविरोधात जगातील समजूतदार नेत्यांना एकत्र आणेल व बहुध्रूवीय जग ही संकल्पना वास्तवात उतरवता येऊ शकते, याचा रशिया आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करील’, असे रिब्कोव्ह यांनी बजावले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने रशियाजवळच्या नॉर्वेमध्ये बॉम्बर्स रवाना केले होते. पण अमेरिकेची बॉम्बर्स दाखल होण्याआधी रशियाच्या अतिप्रगत लढाऊ विमानांनी नॉर्वेजवळून गस्त पूर्ण करून अमेरिकेला इशारा दिला होता. यामुळे सदर क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |