लवकरच अमेरिका व शत्रूदेशांमध्ये सायबरयुद्धाचा भडका उडेल – ‘फायर आय’ कंपनीचे प्रमुख केव्हिन मॅन्डिया यांचा इशारा

लवकरच अमेरिका व शत्रूदेशांमध्ये सायबरयुद्धाचा भडका उडेल – ‘फायर आय’ कंपनीचे प्रमुख केव्हिन मॅन्डिया यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन किंवा रशियासारख्या शत्रूदेशांमध्ये लवकरच सायबरयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेतील आघाडीची सायबरसुरक्षा कंपनी असणार्‍या ‘फायर आय’च्या प्रमुखांनी दिला. या युद्धाचा जबरदस्त फटका सामान्य अमेरिकी जनतेला बसणार असल्याचेही ‘फायर आय’चे प्रमुख केव्हिन मॅन्डिया यांनी बजावले. गेल्या वर्षी रशियन हॅकर्सनी अमेरिकेच्या ‘न्यूक्लिअर नेटवर्क्स’सह महत्त्वाच्या सरकारी विभागांवर सायबरहल्ले चढविले होते. ‘फायर आय’ने या हल्ल्यांची माहिती पहिल्यांदा समोर आणली होती. त्यामुळे या कंपनीच्या प्रमुखांनी सायबरयुद्धाबाबत दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

‘नजिकच्या काळात सायबरक्षेत्रात उघडउघड युद्ध पेट घेऊ शकते. इच्छा असो वा नसो अमेरिकेचे नागरिकही या युद्धात खेचले जाणार आहेत. अ‍ॅप्स आणि नियमित वापरली जाणारी उपकरणे व यंत्रणा काम करणार नाहीत. सामान्य नागरिकांना याबद्दल फारशी माहितीही नाही. कॉम्प्युटर्स काम करीत नसल्याने अचानकपणे विविध गोष्टींचा पुरवठा करणार्‍या यंत्रणांचे काम ठप्प होईल’, या शब्दात ‘फायर आय’चे प्रमुख केव्हिन मॅन्डिया यांनी नव्या सायबरयुद्धात अमेरिकेतील सामान्य जनता भरडली जाईल, असे बजावले.

सायबरक्षेत्रातील हल्ल्यांसाठी व प्रतिहल्ल्यांसाठी कोणतेही नियम अथवा निकष नसल्यामुळे एकापाठोपाठ सातत्याने धक्कादायक हल्ले होत राहतील, असा इशारा ‘फायर आय’च्या प्रमुखांनी दिला. ‘सायबरहल्ले अथवा या क्षेत्रातील घातपातासाठी नियमांना मान्यता मिळेल, अशी शक्यता फारच कमी आहे, कारण हे क्षेत्र असमान युद्धतंत्राचा भाग आहे. आजच्या घडीला लढाऊ विमाने किंवा रणगाड्यांचा वापर करून अनेक देश अमेरिकेला पराभूत करु शकत नाहीत. मात्र सायबरक्षेत्रात गुंतवणूक करून हे देश कदाचित अमेरिकेला हरवू शकतात. जर एखाद्या देशाची यंत्रणा हॅक करणे शक्य आहे, तर त्याचा अर्थ त्या देशावर सायबरहल्ला होऊ शकतो’, या शब्दात मॅन्डिया यांनी सायबरयुद्धाची जाणीव करून दिली.

गेल्या वर्षी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या अमेरिकी कंपन्या ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘सोलरविंड्स’ व ‘फायर आय’वर मोठा सायबरहल्ला झाला होता. ‘मायक्रोसॉफ्ट’च्या प्रमुखांनी हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा सायबरहल्ला असल्याची शक्यता वर्तविली होती. ‘फायर आय’ ही कंपनी अमेरिकेतील अनेक सरकारी विभागांमध्ये सायबर सुरक्षा व कॉम्प्युटर नेटवर्कशी निगडीत प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. या विभागांमध्ये ‘सोलरविंड्स’ कंपनीच्या सॉफ्टवेअरचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. हल्ल्याचा मोठा फटका अमेरिकेच्या अर्थ, व्यापार व ऊर्जा विभागाला बसल्याचे निदर्शनास आले होते.

अमेरिकेतील ‘सायबरसिक्युरिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’सह (सीआयएसए) ‘होमलँड सिक्युरिटी’, ‘एफबीआय’ व ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ या प्रमुख यंत्रणांनी हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचे सांगितले होते. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही सदर हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याची स्पष्ट कबुली दिली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘फायर आय’च्या प्रमुखांनी थेट सायबरयुद्धाबाबत दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

गेल्या वर्षी अमेरिकेतील आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांनी, पहिल्या जागतिक सायबरयुद्धाचा भडका उडेल, असा इशारा दिला होता. अमेरिकेने रशिया, चीन, इराण व उत्तर कोरियावर निर्बंध लादले असून हे देश पारंपारिक संघर्षात अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे ते अमेरिकेला रोखण्यासाठी अपारंपरिक युद्धतंत्राचा वापर करतील, असे रुबिनी यांनी बजावले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info