इराणवरील छोट्या कारवायांचे महत्त्व पुढच्या काळातील युद्धाइतकेच असेल – इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे प्रमुख

इराणवरील छोट्या कारवायांचे महत्त्व पुढच्या काळातील युद्धाइतकेच असेल – इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे प्रमुख

तेल अविव – इस्रायलने इराणविरोधात अधिक कारवाया कराव्या, असे आवाहन इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादचे प्रमुख योसी कोहेन यांनी केले. ‘देशाच्या सुरक्षेसाठी आखल्या जाणार्‍या छोट्या मोहिमा पुढच्या काळातील युद्धाइतक्याच महत्त्वाच्या ठरतात. यामुळे आपण मर्यादा ओलांडली तर भयंकर हानी सहन करावी लागेल, याची जाणीव इराणला होईल’, असे कोहेन यांनी म्हटले आहे.

गुप्तचर यंत्रणा

जगातील सर्वात प्रभावी गुप्तचर संघटना म्हणून मोसादची ओळख आहे. या संघटनेचे प्रमुख कोहेन यांचा कार्यकाळ येत्या काही तासात पूर्ण होत आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी कोहेन यांच्या जागी डेव्हिड बार्नी यांची निवड केली. गेले दशकभर इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेत काम करणार्‍या आणि 2016 सालापासून मोसादचे प्रमुख असलेल्या कोहेन यांना रविवारी मानद डॉक्टरेट देण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना मोसादच्या प्रमुखांनी इराणच्या विरोधातील कारवाया वाढविण्याखेरीज पर्याय नसल्याचे बजावले.

‘इराणी राजवटीविरोधातील कारवाया तीव्र करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपण मर्यादा ओलांडली तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात हानी सोसावी लागेल, याची जाणीव इराणला होईल’, असे कोहेन म्हणाले. इस्रायलला अर्थपूर्ण जीवन जगायचे असेल तर देशाची सुरक्षा भक्कम करणे आवश्यक असल्याचे मोसादच्या प्रमुखांनी ठासून सांगितले. त्याचबरोबर, देशाच्या सुरक्षेसाठी आखल्या जाणार्‍या छोट्या मोहिमा पुढच्या काळातील युद्धाइतक्याच महत्त्वाच्या ठरतात, असे सांगून कोहेन यांनी इराणविरोधी कारवायांचे महत्त्व अधोरेखित केल्याचे दिसते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत कोहेन यांच्या नेतृत्वात मोसादने मोठ्या कारवाया तसेच राजकीय घडामोडी घडवून आणल्या होत्या.

गुप्तचर यंत्रणा

मोसादचे प्रमुख असतानाच, 2018 साली कोहेन यांनी स्वत: इराणमध्ये घुसून अणुकार्यक्रमासंबंधीचे हजारो दस्तावेज, सीडीज्, फाईल्स दोन ट्रक्समध्ये भरून इस्रायलमध्ये आणले होते. पुढे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर हे सारे पुरावे उघड केले होते. मोसाद प्रमुखांनी स्वत:हून पार पाडलेल्या या कारवाईने जगभरातील सार्‍या गुप्तचर यंत्रणा थक्क झाल्या होत्या.

त्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये इराणच्या अणुप्रकल्प, लष्करी ठिकाणे तसेच इराणच्या लष्कराशी संबंधित छुप्या ठिकाणांवर झालेल्या संशयास्पद स्फोटांमागे इस्रायल असल्याचा आरोप इराणी माध्यमांनी केला होता. एप्रिल महिन्यात नातांझ अणुप्रकल्पात झालेला मोठा स्फोट मोसादनेच घडविल्याचा आरोप इराणने केला होता. याशिवाय युएई, बाहरिन या अरब देशांबरोबर झालेल्या अब्राहम करारासाठी कोहेन यांचे प्रयत्न असल्याचा दावा केला जातो.

तर गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या नियोम शहरात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्यात झालेल्या छुप्या भेटीच्या ठिकाणीही कोहेन हजर होते. सौदीने सदर भेटीच्या बातम्या फेटाळल्या होत्या. तर या महिन्याच्या सुरुवातीला कोहेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेऊन इराणबरोबरचा अणुकराराच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली होती.

दरम्यान, पुढच्या दोन दिवसात इस्रायलमध्ये सत्ताबदल अपेक्षित आहे. गेल्या बारा वर्षांपासून इस्रायलच्या सत्तेवर असलेल्या नेत्यान्याहू यांच्याजागी नफ्ताली बेनेट आणि येर लॅपिड यांच्या पक्षाच्या आघाडीचे सरकार येत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर, इराणविरोधी कारवाईबाबत कोहेन यांनी दिलेल्या इशार्‍याचे महत्त्व वाढले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info