रशियन लष्कराकडून पूर्व युक्रेनमधील शहरांवर जोरदार मारा सुरू

- बाखमत सीमेवरील भागावर ताबा मिळविल्याचा रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’चा दावा

मॉस्को/किव्ह – रशियन लष्कराने गेल्या 24 तासांमध्ये पूर्व युक्रेनमधील विविध शहरांवर क्षेपणास्त्रांसह तोफा, रॉकेटस्‌‍ व ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात मारा केला. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनी लष्कराचे 250हून अधिक जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. हल्ल्यात अमेरिकी रॉकेट यंत्रणा, तोफा तसेच रडार्सनाही लक्ष्य करण्यात आल्याचे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. त्याचवेळी डोन्बासमधील निर्णायक भाग म्हणून ओळखण्यात येणाऱ्या बाखमतच्या दिशेने रशियाची आगेकूच सुरू असून शहराच्या सीमेवरील एक भाग ‘वॅग्नर ग्रुप’ने ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

युक्रेनमधील शहरांवर

गुरुवारी तसेच शुक्रवारी रशियाने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले चढविले होते. त्यानंतर शनिवारी रशियाने पुन्हा एकदा पूर्व युक्रेनच्या आघाडीवरील विविध शहरांना लक्ष्य केले. यात ईशान्य भागातील खार्किव्हपासून ते दक्षिणेकडील खेर्सनपर्यंतचा समावेश आहे. या आघाडीवरील काही शहरांमध्ये पुन्हा क्षेपणास्त्रे व ड्रोन्स डागण्यात आली. खार्किव्ह व नजिकच्या भागात तोफा, रॉकेटस्‌‍, रणगाडे तसेच हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने हल्ले चढविण्यात आले.

युक्रेनमधील शहरांवर

डोनेत्स्क प्रांतातील क्रासि लिमन क्षेत्रातही मोठी लष्करी कारवाई करण्यात आली. शनिवारपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये या भागातील जवळपास अडीचशेहून अधिक युक्रेनी जवान ठार झाल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितले. या हल्ल्यांमध्ये अमेरिकी यंत्रणांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा दावा रशियन प्रवक्त्यांनी केला. लुहान्स्क, डोनेत्स्क तसेच झॅपोरिझिआ प्रांतात युक्रेनी ड्रोन्स तसेच रॉकेटस्‌‍चे हल्ले उधळण्यात आल्याचेही रशियन संरक्षण विभागाने स्पष्ट केले.

युक्रेनमधील शहरांवर

दुसऱ्या बाजूला डोनेत्स्कमधील निर्णायक असलेले बाखमत शहर ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेली लढाई अधिकच तीव्र होत चालली आहे. शनिवारी रशियातील खाजगी लष्करी कंपनी असलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’च्या पथकांनी बाखमतच्या सीमेवरील क्रास्नाया गोरा भाग ताब्यात घेतला. हा भाग बाखमत शहराच्या उत्तर सीमेवर असल्याचे ‘वॅग्नर ग्रुप’कडून सांगण्यात आले. त्याचवेळी युक्रेनी फौजा बाखमत वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचा दावाही या गटाकडून करण्यात आला. बाखमतमधील संघर्ष पाहता संपूर्ण डोन्बास क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी रशियाला अनेक महिने लागू शकतात, असा दावा ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख प्रिगोझिन यांनी केला आहे.

दरम्यान, रशियाच्या या प्रखर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अमेरिका व युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती माध्यमांनी दिली. रशियाचे संभाव्य आक्रमण व नवा शस्त्रपुरवठा हे मुद्दे या चर्चेत होते, असे दोन्ही देशांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info