काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये पेटलेल्या संघर्षात ३६ जण ठार झाले आहेत. या संघर्षाच्या काही तास आधी तालिबानने अफगाणिस्तानात कुठल्याही प्रकारची संघर्षबंदी लागू झालेली नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेने १ मेच्या आधी अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेतली नाही तर त्याला नक्कीच प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकीही तालिबानच्या प्रवक्त्याने दिली. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी भारताच्या दौर्यानंतर रविवारी अफगाणिस्तानला भेट दिली.
अफगाण नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी फोर्सेसने अफगाणिस्तानच्या चार प्रांतात तालिबानविरोधात मोहीम छेडली आहे. अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी केलेल्या कारवाईत ३५ तालिबानींना ठार केले. याशिवाय अफगाणी सुरक्षा यंत्रणेच्या जवानाचाही यात बळी गेला. या संघर्षात ३१ तालिबानी जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे. याआधी शुक्रवारी अफगाणी लष्कराने पाकिस्तानच्या शेजारी असलेल्या पाकतिया प्रांतात केलेल्या कारवाईत सात तालिबानी दहशतवाद्यांना अटक केली होती.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी रविवारी आपल्या लष्कराच्या कारवाईचे समर्थन केले. ‘अफगाणी बंधूभगिनींना ठार करण्याचा अधिकार कुणी तालिबानला दिलेला आहे का?’ असा जळजळीत सवाल अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी केला. ‘तालिबानने आधी हिंसाचार थांबवावा आणि मगच शांतीचर्चेत सहभागी व्हावे’, असे आवाहन अफगानिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी केले. याआधीही अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी तालिबानला अमेरिकेबरोबर केलेल्या संघर्षबंदीची आठवण करून दिली होती. पण आपण संघर्षबंदी करण्याचे मान्य केले नव्हते, असे तालिबानचे म्हणणे आहे.
‘अफगाणिस्तानात संघर्षात सहभागी असलेल्या सर्वच गटांनी हिंसाचार कमी करावा, हे तालिबानने मान्य केले होते. मात्र संघर्षबंदीबाबत कधीही चर्चा झाली नव्हती’, असे तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद नईम याने शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच तालिबान सत्तेवर आल्यास अफगाणिस्तानात पुन्हा इस्लामी राजवट लागू केली जाईल, असेही नईम याने स्पष्ट केले.
अमेरिकेबरोबर वाटाघाटीत सहभागी असलेला तालिबानचा कमांडर सुहैल शाहिन याने पाश्चिमात्य देशांना अफगाणिस्तान सोडून जाण्याचा इशारा दिला. ‘१ मेपर्यंत अमेरिका आणि नाटोच्या लष्कराने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घ्यावी. कारण या मुदतीनंतर पाश्चिमात्य देशांचा जवान अफगाणिस्तानात दिसला तर ते कराराचे उल्लंघन ठरेल. याला आमच्याकडून योग्य ते प्रत्युत्तर मिळेल’, असे शाहिनने धमकावले.
गेल्या वर्षभरात तालिबानने अफगाणिस्तानात हल्ले चढविताना अफगाणी जवान, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षकांना लक्ष्य केले होते. मात्र यापुढे आपली मागणी पूर्ण केली नाही तर अमेरिका आणि नाटोच्या जवानांना लक्ष्य केले जाईल, अशी धमकीच तालिबानने दिल्याचा दावा कतारमधील आघाडीच्या वृत्तवाहिनीने केला.
अशा परिस्थितीत, अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन रविवारी अफगाणिस्तानात दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तालिबानची १ मेची मुदत धुडकावली होती. तालिबानने दिलेल्या मुदतीपर्यंत अमेरिकेचे लष्कर अफगाणिस्तानातून माघार घेणार नसल्याचे बायडेन यांनी जाहीर केले होते. रशिया, पाकिस्तान, इराण व भारत या देशांशी चर्चा करून अमेरिका अफगाणिस्तानची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समोर आले होते.
रशिया, इराण या देशांनी अमेरिकेने अफागणिस्तानातून ठरल्याप्रमाणे माघार घ्यावी, अशी मागणी केली आहे. तर अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तान तालिबानच्या हाती पडेल, अशी चिंता भारत व्यक्त करीत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |