अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात आयमन अल जवाहिरी ठार

वॉशिंग्टन – अल कायदाचा प्रमुख आयमन अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने ड्रोनद्वारे चढविलेल्या हेलफायर क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात, सुमारे अडीच कोटी डॉलर्सचे इनाम शीरावर असलेला हा खतरनाक दहशतवादी नेता ठार झाला. अमेरिकेवर 9/11 चा भयंकर दहशतवादी चढवून सुमारे 2977 जणांचा बळी घेण्यासाठी ओसामा बिन लादेन याला जवाहिरीने सहाय्य केले होते. ‘जवाहिरी ठार झाल्याने अमेरिकेला न्याय मिळालेला आहे. आता जवाहिरीपासून जगात कुणालाही धोका संभवत नाही’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर तालिबानने मात्र अमेरिकेचा हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियम तसेच दोहा कराराचे उल्लंघन असल्याची तक्रार केली आहे.

आयमन अल जवाहिरी

अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये अल जवाहिरी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता. तालिबानमधला प्रमुख गट असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी जवाहिरीसाठी इथे सेफ हाऊस तयार केले होते. पण जवाहिरीच्या मागावर असलेल्या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने ही संधी साधून या सेफ हाऊसच्या बाल्कनीत असलेल्या जवाहिरीवर ड्रोनद्वारे हेलफायर क्षेपणास्त्राचा मारा केला. यात जवाहिरी ठार झाला पण त्याच्या नातेवाईकांना इजा झालेली नाही, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे. ‘मी या हल्ल्याचे आदेश दिले होते व अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी अचूक हल्ला चढवून जवाहिरीला ठार केले आणि आपली क्षमता सिद्ध केली’ असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. तुम्ही कुणीही असा व कुठेही दडून बसा, पण जर तुम्ही अमेरिकन नागरिकांवर हल्ले चढविले असतील, तर तुमची सुटका होऊ शकत नाही, हा संदेश जवाहिरी याला संपवून अमेरिकेने दिला आहे, असा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला.

काबुलमध्ये येण्याच्या आधी जवाहिरी पाकिस्तानात होता. मे महिन्यात त्याला पाकिस्तानातून काबुलमध्ये हलविण्यात आले होते. हे काम तालिबानच्या हक्कानी गटाचा कमांडर अझिज हक्कानी याने केल्याची माहिती अमेरिकी माध्यमांनी दिली आहे. विश्वासार्ह सूत्रांच्या हवाल्याने अमेरिकी माध्यमांनी ही बातमी दिली. त्यामुळे अल कायदाचा आधीचा प्रमुख ओसामा बिन लादेन याच्यानंतर पाकिस्तानने जवाहिरीला देखील आश्रय दिला होता, ही बाब जगासमोर येत आहे. यामुळे पाकिस्तानचे दहशतवाद्यांबरोबरील संबंध अजूनही कायम असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, अमेरिकेने जवाहिरीला ठार केल्यानंतर सुरूवातीच्या काळात हक्कानी गटाने या बातमीचा इन्कार केला होता. मात्र काही काही काळाने हक्कानी गटालाही अमेरिकेच्या हल्ल्यात जवाहिरी ठार झाल्याची कबुली द्यावी लागली. त्यानंतर तालिबानने अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकेचा हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियम तसेच तालिबानबरोबर दोहा येथे केलेल्या कराराचे उल्लंघन करणारा असल्याचा ठपका तालिबानने ठेवला आहे. अमेरिकेने मात्र दहशतवाद्यांवर हल्ला चढविण्यापासून आपल्याला रोखणारे कुठलेही कलम दोहा करारात नव्हते, असे सांगून तालिबानचा आक्षेप धुडकावून लावला आहे. तालिबानचे काही नेते जवाहिरी याला राष्ट्रीय सन्मान देण्याची मागणी करीत आहेत. तर तालिबानचा परराष्ट्रमंत्री मोत्ताकी याने त्याला विरोध केला आहे.

काही महिन्यांपूर्वी जवाहिरीने अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी अल कायदाच्या नव्या गटाची घोषणा केली होती. यामुळे जवाहिरी ठार झाल्याने, भारताला असलेला धोका बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्याचवेळी जवाहिरीनंतर अल कायदाची जबाबदारी सैफ अल-अदेल याच्यावर सोपविण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 71 वर्षांचा जवाहिरी केवळ व्हिडिओ प्रसिद्ध करून दहशतवाद्यांना संदेश देण्याचे काम करीत होता. अल कायदाच्या कारवायांची जबाबदारी अदेलच पार पाडत होता, अशी माहिती समोर येत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info