रशियाकडून युक्रेन सीमेवर ‘एस-४००’ क्षेपणास्त्रांसह चार हजार जवान तैनात – युरोपियन वॉर किंवा महायुद्ध भडकण्याचा रशियन विश्‍लेषकांचा इशारा

रशियाकडून युक्रेन सीमेवर ‘एस-४००’ क्षेपणास्त्रांसह चार हजार जवान तैनात – युरोपियन वॉर किंवा महायुद्ध भडकण्याचा रशियन विश्‍लेषकांचा इशारा

मॉस्को/किव्ह – रशियाकडून युक्रेनच्या सीमेनजिक ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणेसह रणगाडे, हेलिकॉप्टर्स व चार हजार जवान तैनात केले आहेत. या तैनातीच्या बरोबरीने नाटोने युक्रेनमध्ये अतिरिक्त तैनाती केल्यास रशियाला पावले उचलणे भाग पडेल, असा सज्जड इशारा रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. रशिया-युक्रेन सीमेवर चिघळत असलेल्या परिस्थितीमुळे ‘युरोपियन वॉर’ किंवा महायुद्धही भडकू शकते, असे रशियातील लष्करी विश्‍लेषकांनी बजावले आहे.

गेल्या महिन्यात रशिया-युक्रेन सीमेवरील डोन्बासमध्ये उडालेल्या एका चकमकीत युक्रेनच्या चार जवानांचा बळी गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता. हा दावा करतानाच युक्रेन सीमेवर रशियाकडून मोठी लष्करी जमवाजमव सुरू झाल्याचा आरोप युक्रेनने केला होता. त्यानंतर अमेरिका व नाटोनेही रशियाच्या हालचालींवर चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेच्या युरोपियन कमांडने, रशियाच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर ‘हायेस्ट ऍलर्ट’ही जारी केला होता.

त्यानंतर आता रशियाकडून सुरू असलेल्या लष्करी हालचालींची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेन सीमेनजिक चार हजार जवान तैनात केले आहेत. त्यानंतर आता ‘एस-४००’ ही प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणा, हेलिकॉप्टर्स, रणगाडे व सशस्त्र वाहनेही युक्रेन सीमेवर पाठविण्यात येत आहेत. या हालचालींचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ही तैनाती युद्धसरावासाठी असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला असून कोणालाही धमकावण्याचा उद्देश नाही, असे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले.

मात्र त्याचवेळी नाटोने युक्रेनमध्ये सैन्य तैनात केल्यास त्याविरोधात रशियाला पावले उचलणे भाग पडेल, असा इशारा रशियन प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. दरम्यान, रशियातील आघाडीचे लष्करी विश्‍लेषक पावेल फेल्गेनहॉअर यांनी, रशिया युक्रेन सीमेवरील हालचालींमुळे ‘युरोपियन वॉर’ किंवा महायुद्ध भडकू शकते, असे बजावले आहे. ‘रशिया-युक्रेन सीमेवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. पुढे काय होईल कोणीच सांगू शकत नाही. पाश्‍चात्य देेशांमध्ये याबाबत खूपच गोंधळाची स्थिती असून, काय करायचे याबद्दल ते अनभिज्ञ आहेत’, असे फेल्गेनहॉअर पुढे म्हणाले.

रशियाकडून सुरू असणार्‍या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका तसेच युरोपिय नेत्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेत, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनचे सार्वभौमत्त्व व अखंडतेसाठी अमेरिका पूर्ण समर्थन देईल, असे आश्‍वासन दिल्याचे सांगण्यात येते. बायडेन यांच्या फोनपूर्वी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन तसेच परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी युक्रेनमधील नेत्यांशी बोलणी केल्याचेही समोर आले आहे.

जर्मनी व फ्रान्स या आघाडीच्या युरोपिय देशांनी संयुक्त निवेदन जारी केले असून, रशियन लष्कराच्या हालचालींवर लक्ष असल्याचे म्हटले आहे. रशिया-युक्रेन सीमेवरील तणावावर चिंता व्यक्त करून, आपले युक्रेनला पूर्ण समर्थन असल्याचेही संयुक्त निवेदनात सांगण्यात आले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info