बाखमतमध्ये रशियाला यश मिळत असल्याची युक्रेनची कबुली

- युक्रेन दररोज 500 जवान गमावित असल्याचा रशियासमर्थक अधिकाऱ्याचा दावा

किव्ह/मॉस्को – रशियन फौजांकडून पूर्व युक्रेनमधील बाखमत शहरात सुरू असलेल्या मोहिमेत रशियाने आगेकूच करण्यात यश मिळविल्याची कबुली युक्रेनने दिली आहे. रशियाकडून बाखमतवर सातत्याने हल्ले सुरू असल्याचेही युक्रेनच्या लष्कराने आपल्या अहवालात म्हटले आहे. युक्रेनी लष्कराने बाखमतसंदर्भात पहिल्यांदाच आपले अपयश मान्य केले असून हा रशिया-युक्रेन संघर्षातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. युक्रेनकडून पराभवाची कबुली समोर येत असतानाच, युक्रेनी लष्कराला बाखमतनजिक दररोज 500 जवान गमवावे लागत असल्याचा दावा रशिया समर्थक बंडखोर गटाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

यश

डोन्बास क्षेत्रातील मध्यवर्ती भागात वसलेले शहर म्हणून बाखमत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या शहरातून डोन्बास क्षेत्रातील विविध शहरांना जोडणारे रस्ते जात असल्याने नियंत्रणाच्या दृष्टीने हे शहर रशियन फौजांसाठी निर्णायक ठरते. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून बाखमतमध्ये संघर्ष करणाऱ्या रशियन लष्कराने नवीन वर्षात त्याला प्राधान्य दिले होते. नव्या लष्करी तुकड्या व मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री तैनात करण्यात आली होती.

बाखमतनजिकचे भाग टप्प्याटप्प्याने काबीज करण्यावर भर देण्यात आला होता. युक्रेनी लष्कराचा प्रतिकार मोडून काढत रशियाने या भागात आगेकूच करण्यात यश मिळविले होते. बाखमतमधील परिस्थिती कठीण झाल्याचे मान्य करणाऱ्या युक्रेनी नेतृत्त्वाने त्या भागातून माघार घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र रशियाच्या प्रखर हल्ल्यांपुढे युक्रेनी लष्कराचा प्रतिकार कमी पडल्याचे गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रमावरून समोर आले आहे.

यश

काही आठवड्यांपूर्वी रशियन लष्कर व वॅग्नर ग्रुपने शहराचा पूर्व भाग पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला होता. या भागातील फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर युक्रेनने पूर्व भागावरील नियंत्रण गमावल्याचे मान्य केले होते. त्याचवेळी युक्रेन कोणताच भाग रशियाच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असे सांगून बाखमतसाठी निर्णायक लढाईचे निर्देश युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले होते. पण त्यानंतरही रशियन फौजा व वॅग्नर ग्रुप टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असल्याची माहिती समोर आली आहे.

बाखमत शहरातील उत्तर भागात असणाऱ्या ‘ॲझॉम प्लँट कॉम्प्लेक्स’वर वॅग्नर ग्रुपने आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बाखमतच्या दक्षिण भागातील काही क्षेत्रही वॅग्नर ग्रुपच्या तकड्यांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. युरोपिय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत बाखमत शहराचा जवळपास 80 टक्के भाग रशियाच्या ताब्यात गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या लष्कराने रशियाला मिळत असलेल्या यशाबद्दल दिलेली कबुली लक्ष वेधून घेणारी ठरते.

दरम्यान, रशियाने अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकासाठी काम करणाऱ्या इव्हान गर्शकोव्हिच या पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली आहे. शीतयुद्धाच्या कालावधीनंतर अमेरिकी पत्रकाराला रशियात अटक होण्याची ही पहिलीच घटना ठरते.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info