अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तैवानला भेट दिल्यास ‘चीन-तैवान’ युद्ध भडकेल – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ची धमकी

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेकडून तैवानसाठी एकापाठोपाठ होणार्‍या घोषणांनी चीन चांगलाच बिथरल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ शेवटच्या क्षणी तैवानला भेट देऊ शकतात, असा दावा करून ही भेट ‘चीन-तैवान’ युद्ध भडकविणारी ठरेल, अशी धमकी चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली आहे. गेल्याच आठवड्यात परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, अमेरिका व तैवानमधील राजनैतिक संबंधांवर असणारी सर्व नियंत्रणे रद्दबातल करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यावर टीकास्त्र सोडताना ‘ग्लोबल टाईम्स’ या दैनिकाने तैवानसह अमेरिकेला धमकावले आहे.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने आपल्या विस्तारवादी कारवायांना वेग दिला असून ‘साऊथ चायना सी’ व ‘ईस्ट चायना सी’सह विविध भागांवर ताबा मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी नवा सुरक्षा कायदा लागू करून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हाँगकाँगवर आपला एकछत्री अंमल सुरू करण्यात यश मिळविले होते. तैवान हा त्यातील पुढील टप्पा असल्याचे मानले जात असून चीनमधील लष्करी अधिकार्‍यांकडून तसे संकेतही देण्यात आले आहेत. चीनचे हे इरादे उधळण्यासाठी अमेरिकेने तैवानबरोबरील सहकार्य अधिक मजबूत व व्यापक करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही वर्षात अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणावर शस्त्रसहाय्य पुरविले असून त्यापुढे जात राजनैतिक मान्यतेसाठी वेगाने पावले उचलली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेने तैवानमध्ये दूतावासाचा दर्जा असणारे अधिकृत राजनैतिक कार्यालय सुरू केले होते. २०१९ साली तैवानच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचीही भेट घेतली होती. गेल्या वर्षी अमेरिकेने आपले आरोग्यमंत्री अलेक्स अझार तसेच परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी केथ क्रॅक यांना तैवान दौर्‍यावर धाडले होते. अमेरिकी संरक्षणदलातील वरिष्ठ गुप्तचर अधिकार्‍याने तैवानला भेट दिल्याचे वृत्तही समोर आले होते.

त्यापाठोपाठ आता अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील दूत केली क्राफ्ट तैवानला भेट देणार आहेत. अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या भेटी तैवानला राजनैतिक मान्यता देणार्‍या मानल्या जातात. त्यामुळे चीनची राजवट संतापली असून अमेरिकेला सातत्याने धमकावत आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ हे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असून त्यातून या राजवटीची भूमिका मांडली जाते. त्यामुळे त्यात प्रसिद्ध होणारे इशारे व धमक्यांना चीनच्या सत्ताधार्‍यांचे समर्थन असल्याचे मानले जाते.

रविवारी प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ अखेरच्या क्षणी तैवानला भेट देऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे. तसे झाले तर चीनची लढाऊ विमाने तैवानवर धडक मारून हल्ला चढवतील व विरोध झाल्यास आक्रमक कारवाई करून तैवान ताब्यात घेतील, अशी धमकी ‘ग्लोबल टाईम्स’ने दिली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info