मॉस्को/लंडन/पॅरिस – ‘ब्लॅक सी’च्या क्षेत्रातील सरावासाठी रशियाची ५० लढाऊ तसेच बॉम्बर विमानांचा ताफा क्रिमिआमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय रशियाची विनाशिका देखील तुर्कीचे बॉस्फोरसचे आखात पार करून ब्लॅक सीमध्ये प्रवेश करीत असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियाबाबत मर्यादारेषा आखण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे फ्रान्सने बजावले आहे.
रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रशियाची ‘सदर्न मिलिटरी डिस्ट्रिक्ट’ (वाययूव्हीओ) ब्लॅक सीच्या क्षेत्रात मोठा युद्धसराव करणार आहे. यामध्ये रशियन हवाईदल, नौदल तसेच हवाई सुरक्षा यंत्रणा देखील सहभागी होणार आहे. रशियन हवाईदलातील ‘सुखोई-२७एसएम’, ‘सुखोई-३०एसएम’ ही लढाऊ विमाने तर ‘सुखोई-२४एम’ आणि ‘सुखोई-३४’ बॉम्बर्स तसेच ‘सुखोई-२५एसएम३’ या हल्लेखोर विमानांचा समावेश आहे. पन्नासहून अधिक रशियन विमानांचा ताफा क्रिमिआत दाखल झाला आहे.
याशिवाय रशियन नौदलातील कॅलिबर क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली मॅकारोव्ह विनाशिका तसेच ग्रेवोरोन आणि विश्नी वोलोशेक या गस्तीनौका देखील कॅस्पियन समुद्रातून ब्लॅक सीसाठी रवाना झाल्या आहेत. यापैकी मॅकारोव्ह विनाशिका बॉस्फरसचे आखात ओलांडून ब्लॅक सीच्या क्षेत्रात दाखल झाल्याच्या बातम्या व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. ब्लॅक सीमध्ये आयोजित होणार्या या युद्धसरावाबाबत रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी चार दिवसांपूर्वी घोषणा केली होती.
नाटोपासून वाढत असलेल्या धोक्याला प्रत्युत्तर म्हणून या सरावाचे आयोजन करीत असल्याचा इशारा संरक्षणमंत्री शोईगू यांणी दिला होता. तर ब्लॅक सीमध्ये रशियाने आयोजित केलेला युद्धसराव या क्षेत्रातून उड्डाण करणार्या प्रवासी विमानांसाठी इशारा असल्याची टीका युरोपिय माध्यमे करीत आहेत. यासाठी २०१४ साली रशियासमर्थक बंडखोरांनी मलेशियाचे ‘एमएच-१७’ विमान पाडले होते, याची आठवण ही माध्यमे करून देत आहेत.
अशा परिस्थितीत, ब्रिटन ब्लॅक सीच्या क्षेत्रात आपली विनाशिका रवाना करणार आहे. ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने वरिष्ठ नौदल अधिकार्याच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध केली. मे महिन्यात ब्रिटनच्या रॉयल नौदलातील प्रगत विनाशिका ब्लॅक सीच्या गस्तीसाठी रवाना होईल. यावेळी ब्रिटनच्या ‘क्विन एलिझाबेथ’ विमानवाहू युद्धनौकेवरील एफ-३५ विमाने आणि मर्लिन पाणबुडी कुठल्याही आगळीकीसाठी सज्ज असतील, असे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे.
दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या तणावावरुन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी इशारा दिला आहे. ‘काही वर्षांपूर्वी युक्रेनबाबत जे काही घडले, ते राजनैतिक स्तरावरील अपयश होते. त्यातून शिकवण घेत आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियाबाबत मर्यादारेषा आखावी. फक्त निर्बंध लादून सर्व समस्या सुटत नाहीत’, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केले आहे.