नॅव्हॅल्नी प्रकरणावरुन अमेरिकेचा रशियाला इशारा – युरोपिय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची तातडीची बैठक

नॅव्हॅल्नी प्रकरणावरुन अमेरिकेचा रशियाला इशारा – युरोपिय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची तातडीची बैठक

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या आणि सध्या तुरूंगात कैद असलेल्या ऍलेक्सी नॅव्हॅल्नी प्रकरणी अमेरिकेने रशियाला धमकावले आहे. नॅव्हॅल्नीचे काही बरेवाईट झाले तर त्यापुढील परिणामांसाठी रशिया जबाबदार असेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने नॅव्हॅल्नी विषप्रयोगप्रकरणी रशियाच्या सात अधिकार्‍यांवर निर्बंध लादले होते. अशा परिस्थितीत, बायडेन प्रशासनाकडून रशियाला नव्या निर्बंधांची धमकी दिली जात असल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ऍलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर प्राणघातक विषप्रयोग झाला होता. नॅव्हॅल्नी यांच्यावरील या विषप्रयोगासाठी रशियन सरकार जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. नॅव्हॅल्नी हे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. या विषप्रयोगानंतर रशियात परतलेल्या नॅव्हॅल्नी यांना अटक करून तुरुंगात धाडण्यात आले होते. नॅव्हॅल्नी यांना झालेल्या अटकेच्या विरोधात रशियामध्ये निदर्शनेही भडकली होती.

या कारवाईविरोधात युरोपिय देशांनी रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टीही केली होती. त्यावेळी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने नॅव्हॅल्नी हे नाटोचे एजंट असल्याचा आरोप केला होता. नॅव्हॅल्नी आणि त्यांच्या साथीदारांची युरोपिय महासंघासह अमेरिका व ब्रिटनच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्याचा ठपका रशियाने ठेवला होता. यासंबंधीचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. ही बैठक म्हणजे रशियामध्ये अस्थैर्य निर्माण करण्याचा कट असल्याचे रशियाने म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने रशियाच्या सात राजनैतिक अधिकार्‍यांवर निर्बंध लादले होते.

सध्या रशियाच्या तुरुंगात असलेल्या नॅव्हॅल्नी यांची तब्येत बिघडली असून त्यांना योग्य उपचार दिले जात नसल्याची टीका त्यांच्या डॉक्टराने केली आहे. तर रशियन सरकारने पुरविलेले उपचार व डॉक्टर नॅव्हॅल्नी स्वीकारायला तयार नाहीत, अशी टीका रशिया करीत आहे. यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी रशियाला धमकावले आहे.

‘रशियाच्या कैदेत असताना नॅव्हॅल्नी यांचा मृत्यू झाला तर रशियाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय रशियाला जबाबदार धरेल’, असे रशियन सरकारला कळविण्यात आल्याची माहिती सुलिवन यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. याशिवाय नॅव्हॅल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे सिद्ध झाले किंवा मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले तर रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी धमकावले आहे. अमेरिकेप्रमाणे युरोपिय महासंघाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील नॅव्हॅल्नी प्रकरणी आपली चिंता व्यक्त केली असून येत्या काही तासात या नेत्यांमध्ये व्हर्च्युअल बैठक पार पडणार आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info