चीन देखील अफगाणिस्तानातील दफनभूमीच्या गाळात रूतेल

अमेरिकेचे वरिष्ठ विश्‍लेषक गॉर्डन चँग

वॉशिंग्टन – तालिबान चीनकडे अफगाणिस्तानचा मित्र म्हणून पाहत असून येथे गुंतवणूक करण्यासाठी चीनने लवकरात लवकर यावे, असे आवाहन तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहिन याने केले. चीनच्या गुंतवणूकदारांना आणि कर्मचार्‍यांना तालिबान सुरक्षा पुरविल, असे आश्‍वासनही तालिबानच्या प्रवक्त्याने दिले. पण ‘चीनचे साम्राज्य देखील अफगाणिस्तानच्या दफनभूमीत नक्कीच अपयशी ठरेल. येथील गाळात चीन रूतून जाईल आणि हे पाहणे मजेशीर ठरेल’, असे अमेरिकेचे ज्येष्ठ विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी म्हटले आहे. 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेची अफगाणिस्तानातील माघार पूर्ण होईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. अमेरिकेच्या या माघारीचा फायदा घेऊन चीन अफगाणिस्तानात शिरकाव करील, असा दावा केला जातो. याआधी अफगाणिस्तानात अपयशी ठरलेल्या सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेप्रमाणे चीन अफगाणिस्तानच्या जाळ्यात अडकणार नाही, असा दावा चीनचे सरकारी मुखपत्र व या देशाचे विश्‍लेषकांनी केला होता. यासाठी पाकिस्तानसारखा सहकारी देश चीनच्या साथीला असल्याचे चिनी विश्‍लेषकांनी ठासून सांगितले होते.

दफनभूमीत

चीनचे नेते देखील पाकिस्तानवर विश्‍वास टाकत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने सहकार्य करावे, असे आवाहन चीनने केले. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी पाकिस्तान व अफगाणिस्तानसह त्रिपक्षीय सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रस्तावही दिला. अफगाणिस्तानविषयक चीनच्या सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी हालचालींवर अमेरिकेचे ज्येष्ठ विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

‘अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात पाय पसरविण्याची संधी चीनसारख्या लबाड देशाकडे चालून आलेली आहे. पण उत्तम संधी भासत असली तरीचीन अफगाणिस्तानात यशस्वी ठरेल, असा अर्थ त्यातून काढता येणार नाही’, असा दावा चँग यांनी केला. अफगाणिस्तानातील सोने, युरेनियम, लिथियम आणि इतर खनिजसंपत्तीवर चीनचा डोळा आहे. ते मिळविण्यासाठी पाकिस्तानातील 62 अब्ज डॉलर्स गुंतवणूकीचा सीपीईसी प्रकल्प पेशावर-काबुल असा जोडण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. सदर प्रकल्प अफगाणिस्तानात नेण्यात चीनला यश मिळेल. पण यानंतर होणारे नुकसान चीनच्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी मोठे असेल, असा इशारा चँग यांनी दिला.

अफगाणिस्तानातील आपले हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी चीनचे अधिकारी गेली काही वर्षे गुप्तपणे हक्कानी नेटवर्कशी सहकार्य करून आहेत. या हक्कानी नेटवर्कच्या सहाय्याने अफगाणिस्तानातील चीनविरोधी उघुर आणि तुर्कवंशिय अल्पसंख्यांकांची धरपकड केली. उघुर आणि तुर्क अल्पसंख्यांकांवरील कारवाईकडे तालिबानने डोळेझाक करावी, अशी चीनची इच्छा असेल तर तसे होणार नाही, असे चँग म्हणाले. चीन कितीही धुर्त असला तरी तालिबान हे चीनपेक्षाही कितीतरीपट अधिक लबाड आहेत, याची जाणीव चँग यांनी करून दिली.

दफनभूमीत

त्याचबरोबर 1996 साली तालिबानच्या स्थापनेपासून ते अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्यानंतरही चीनने तालिबानला पूर्ण सहकार्य केले. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या या सहाय्याचा चीनला काही प्रमाणात लाभ होईल. पण अफगाणिस्तानात यशस्वी ठरण्यासाठी तालिबान हे एकमेव आव्हान नाही. या देशात सशस्त्र समर्थक आणि विरोधक तसेच सतत सुरू असणारा हिंसाचार, अशी अनेक आव्हाने चीनसमोर असतील, याची आठवण चँग यांनी करून दिली.

अफगाणिस्तानच्या दफनभूमीत चीनला उद्ध्वस्त करण्यासाठी भारत आपल्या हस्तकांचा वापर करील. कारण चीन आणि हक्कानी नेटवर्कमधील सहकार्याचा पर्दाफाश भारतीय गुप्तचर यंत्रणांनीच केला होता, याकडे चँग यांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षी भारताच्या लडाखच्या एलएसीजवळ चीनने केलेल्या आगळिकीची किंमत मोजण्यासाठी भारत चीनला अफगाणिस्तानात त्रास देऊ शकतो, असा निष्कर्ष चँग यांनी नोंदविला.

‘आपल्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून आपण बरेच काही करू शकतो, असे चीनला वाटत असले तरी अफगाणिस्तानच्या दफनभूमीत चीन रूतेल आणि ते पहायला मला आवडेल’, असे चँग यांनी म्हटले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info