रशिया कधीही युक्रेनवर हल्ला चढवू शकतो

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांचा इशारा

किव्ह/मॉस्को – रशिया येत्या काही दिवसात कधीही युक्रेनवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला आहे. रशियासमोर मतभेद दूर करण्यासाठी राजनैतिक चर्चेचा पर्याय उपलब्ध आहे, असा दावाही ब्लिंकन यांनी केला. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन सध्या युक्रेनच्या दौर्‍यावर असून यावेळी त्यांनी युक्रेनला २० कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त संरक्षणसहाय्याचीही घोषणा केली. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे द्विपक्षीय संसदीय शिष्टमंडळ युक्रेन दौर्‍यावर आले होते. दरम्यान, नाटोने युक्रेनच्या मुद्यावर पुन्हा एकदा रशियाशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे.

कधीही युक्रेनवर हल्ला

रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखांहून अधिक जवान तैनात केले असून त्याबरोबर प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणा, रणगाडे व सशस्त्र वाहनांचाही समावेश आहे. रशिया युक्रेनवर आक्रमणाची तयारी करीत असून जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्यात हल्ला चढवेल असे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, पाश्‍चात्य देशांकडून रशियावरील दबाव वाढविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री बुधवारी युक्रेनमध्ये दाखल झाले.

परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमित झेलेन्स्की तसेच परराष्ट्रमंत्री कुलेबा यांच्याशी चर्चा केली. यावेळी रशियाकडून आक्रमणाची शक्यता अधिक वाढल्याचा इशारा त्यांनी दिला. रशिया युक्रेन सीमेवरील सैन्यतैनाती दुपटीने वाढवून अत्यंत कमी वेळात हल्ला चढवू शकतो, याकडे ब्लिंकन यांनी लक्ष वेधले. युक्रेन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी रशियासमोर वाटाघाटींचा मार्गही खुला असल्याचा दावा अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी केला. यावेळी अमेरिकेकडून युक्रेनला असणार्‍या समर्थनाचा पुनरुच्चार करीत, २० कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची घोषणाही केली.

कधीही युक्रेनवर हल्ला

युक्रेन दौर्‍यानंतर अमेरिकी परराष्ट्रमंत्री शुक्रवारी जीनिव्हात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत अमेरिका कोणताही प्रस्ताव सादर करणार नसल्याचे ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी रशियाने केलेल्या मागण्यांचा उल्लेख त्यांनी ‘नॉन स्टार्टर’ असा केला आहे.

गेल्या काही दिवसात रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये झालेली चर्चा अपयशी ठरल्यानंतर रशियन हालचालींना अधिक वेग आल्याचे दिसत आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, पाश्‍चात्यांना दिलेल्या प्रस्तावाच्या मुद्यावर रशिया फार काळ वाट पाहणार नसल्याचे बजावले आहे. तर रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी युक्रेनमध्ये होणारे आक्रमण ही रशियासाठी ‘रेड लाईन’ असून नाटोच्या कारवायांना ‘काऊंटर ऍक्शन्स’च्या रुपात प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info