तैवान स्वतंत्र, सार्वभौम देश आहे – तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लई चिंग-ते यांचा चीनला इशारा

तैवान स्वतंत्र, सार्वभौम देश आहे – तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लई चिंग-ते यांचा चीनला इशारा

तैपेई/बीजिंग/कॅनबेरा – ‘तैवान हा स्वतंत्र सार्वभौम देश आहे. चीनच्या अधीन असलेला भूभाग नाही. तेव्हा या भूभागावर राहणार्‍या दोन कोटी ३० लाख जनतेव्यतिरिक्त अन्य कुणालाही या देशाचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार नाही’, अशा खणखणीत शब्दात तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लई चिंग-ते यांनी चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला आव्हान दिले. याबरोबरच चीनने तैवानमध्ये घुसखोरी केली तर त्यांना प्रत्युत्तर देणारी शस्त्रास्त्रे आपल्याकडे असल्याचा इशारा तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला.

रविवारी तैवानमध्ये ‘ग्लोबल तैवान नॅशनल अफेअर्स सिम्पोझियम’चे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात बोलताना उपराष्ट्राध्यक्ष लई चिंग-ते यांनी चीनवर घणाघात केला. तसेच ‘वन चायना, टू सिस्टिम्स’ हे धोरण रेटणार्‍या चीनच्या जिनपिंग यांच्या राजवटीमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन शिगेला पोहोचल्याची जहरी टीका उपराष्ट्राध्यक्ष चिंग-ते यांनी केली. यासाठी तैवानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवर होणारे अत्याचार, हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनावर चीनने केलेली कारवाई यांचा उल्लेख चिंग-ते यांनी केला.

याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवान उल्लेख ‘रिपब्लिक ऑफ चायना’ असा न करता ‘रिपब्लिक ऑफ तैवान’ असा करण्याचे या परिसंवादात सुचविण्यात आले. या एका निर्णयामुळे तैवानबरोबर इतर देशांना सहकार्य करणे अधिक सोपे होईल, असा दावा तैवानच्या सरकारकडून केला जातो. तसेच ‘वन चायना, टू सिस्टिम्स’ला हादरे बसतील, असे बोलले जाते.

तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. या तैवानचा ताबा घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी लष्करी कारवाई करावी, अशी मागणी चीनच्या माजी लष्करी अधिकारी व विश्‍लेषकांकडून केली जाते. गेल्या तीन महिन्यांपासून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडूनही तसे संकेत दिले जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी तीन युद्धनौकांचे जलावतरण केले. यामध्ये एका ऍम्फिबियस युद्धनौकेचा समावेश आहे. सदर युद्धनौकेचा वापर तैवानविरोधात होऊ शकतो, असा दावा चिनी माध्यमे करीत आहेत.

ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी देखील चीन तैवानविरोधात युद्धाची घोषणा करू शकतो, असा इशारा दिला आहे. चीनने वारंवार तैवानला आपल्यात सामील करून घेण्याच्या घोषणा केल्या असून यासाठी चीन तैवानवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डटन यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी देखील येत्या काळात चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा दिला होता. असे झाले तर त्याचे दूरगामी परिणाम इंडो-पॅसिफिकवर होतील, असेही ऑस्ट्रेलियन अधिकार्‍याने बजावले होते.

दरम्यान, चीनच्या लष्कराने आपल्या हद्दीत घुसखोरी केली तर त्याला प्रत्युत्तर देण्याची सर्व तयारी आपण केली आहे. चीनला प्रत्युत्तर देणारी शस्त्रास्त्रे आपल्या देशाकडे असल्याचे तैवानचे संरक्षणमंत्री ली शिह-चियांग यांनी म्हटले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info