अमेरिका इंडो-पॅसिफिकमधली तैनाती कायम ठेवणार – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची घोषणा

अमेरिका इंडो-पॅसिफिकमधली तैनाती कायम ठेवणार – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपली लष्करी तैनाती कायम ठेवणार आहे. ही तैनाती या क्षेत्रात संघर्षासाठी नसेल, तर संघर्ष टाळण्यासाठी असेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना आपण अमेरिकेच्या या धोरणांची कल्पना दिल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेला चीन व रशियासोबत संघर्ष छेडायचा नाही, पण अमेरिका आपल्या हितसंबंधांचे रक्षण केल्यावाचून राहणार नाही, असेही राष्ट्राध्यक्ष बायडेन पुढे म्हणाले.

अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ही भूमिका मांडली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेची लष्करी तैनाती यापुढेही कायम ठेवण्यात येईल. पण ही तैनाती संघर्षासाठी नाही, तर संघर्ष टाळण्यासाठी असेल. जशी युरोपात अमेरिकेची नाटोसहीत करण्यात आलेली लष्करी तैनाती ही संघर्ष टाळण्यासाठी आहे. तशीच भूमिका अमेरिकेने इंडो-पॅसिफिकबाबत स्वीकारलेली आहे, असा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेत आपण त्यांना याची माहिती दिल्याचेही बायडेन यांनी स्पष्ट केले.

चीन व रशिया या देशांबरोबर अमेरिकेला संघर्ष अपेक्षित नाही. मात्र आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी अमेरिका योग्य ते निर्णय घेईल, असेही बायडेन पुढे म्हणाले. अमेरिकेचा स्पर्धात्मकतेवर विश्‍वास आहे व चीनबरोबरील स्पर्धेचे अमेरिका स्वागत करील. पण सरकारी अनुदानावर उद्योग पोसून त्याद्वारे अमेरिकन कामगारांचा रोजगार व अमेरिकन बुद्धिसंपदेची चोरी करून तंत्रज्ञान पळविण्याचा चीनचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिला. याबरोबरच मानवाधिकारांच्या हननाकडे अमेरिका दुर्लक्ष करणार नाही, असा इशाराही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिला.

अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांना पहिल्यांदाच संबोधित करताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीन व इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत केलेली ही विधाने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी उचलून धरली आहेत. बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, चीनच्या आक्रमकतेमध्ये जबरदस्त वाढ झाल्याचे समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना, अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटणार नाही, याचा विचार करून चीन हालचाली करीत होता. पण बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या वर्चस्ववादी कारवाया तीव्र केल्या आहेत.

म्यानमारमधील लष्करी बंड, फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील अतिक्रमण आणि तैवानच्या हद्दीतील घुसखोरी हे सारे चीनच्या वाढत्या आक्रमक व विस्तारवादी धोरणांचे परिणाम आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन आपल्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारून कडक कारवाई करणार नाही, याची खात्री पटल्यामुळेच चीन बेलगाम बनला आहे, असे बायडेन यांचे टीकाकार बोलत आहेत. यामुळे अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात आले असून बायडेन यांनी अशीच बोटचेपी भूमिका कायम ठेवली, तर अमेरिकेचे निकटतम सहकारी देश असुरक्षित बनतील, असा इशारा विरोधी पक्षनेत्यांकडून दिला जात आहे.

या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी बायडेन यांनी काही आठवड्यांपूर्वी भारत, जपान व ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांबरोबर क्वाडच्या बैठकीचे आयोजन केले होेते. आता अमेरिकन संसदेच्या सभागृहांना आश्‍वस्त करून राष्ट्राध्यक्ष बायडेन इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेची तैनाती कायम ठेवण्याचा इशारा चीनला देत आहेत. आरोप केला जातो तसे आपण चीनधार्जिणे किंवा चीनबाबत सौम्य भूमिका स्वीकारणारे नाहीत, असे दाखविण्याचा प्रयत्न राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन करीत आहेत. पण बायडेन यांच्या चीनविरोधी भाषणांवर विश्‍वास ठेवता येणार नाही. वरकरणी ते चीनवर सडकून टीका जरूर करतील व चीनच्या विरोधात कारवाईचे चित्र देखील उभे करतील. पण प्रत्यक्षात ते चीनच्या विरोधात कारवाई करणार नाहीत, उलट चीनला अप्रत्यक्ष लाभ मिळेल, अशीच धोरणे बायडेन स्वीकारतील, असा आरोप काही विश्‍लेषक करीत आहेत.

बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, त्यांंनीही असेच धोरण स्वीकारून चीनला आपला प्रभाव आणि वर्चस्व वाढविण्याची संधी मिळवून दिली होती. ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना, बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते, याची आठवण विश्‍लेषक करून देत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info