रशियाकडून राजधानी किव्हसह युक्रेनच्या प्रमुख शहरांमध्ये घणाघाती ड्रोन हल्ले

- डोन्बासमध्ये रशियन सैन्याची आगेकूच

मॉस्को/किव्ह – युक्रेनकडून रशियावर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला तितकेच प्रखर व आक्रमक प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. शनिवारी तसेच रविवारी युक्रेनने रशियाच्या बेलगोरोद प्रांतात हल्ले चढविले होते. सोमवारी युक्रेनची राजधानी किव्हसह इतर अनेक शहरांमध्ये घणाघाती ड्रोन हल्ले चढवून रशियाने त्याला जबर प्रत्युत्तर दिले. रशियाने केलेल्या ड्रोनहल्ल्यांमध्ये युक्रेनची मोठ्या प्रमाणात जीवित तसेच मालमत्तेची हानी झाल्याचे समोर आले आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या जवळपास १०० भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला असून हे भाग अंधारात गेल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.

राजधानी किव्हसह

दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनने रशियाच्या ताब्यातील क्रिमिआतील कर्च ब्रिजवर दहशतवादी हल्ला चढविला होता. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनला इशारा देत जोरदार क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते. तब्बल आठ महिन्यांनंतर रशियाने चढविलेल्या मोठ्या क्षेपणास्त्रहल्ल्यांनी युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीलाही हादरा बसला होता. हे हल्ले सुरुवात असून पुढील काळात रशिया अधिक तीव्र हल्ले करील, असे रशियाकडून बजावण्यात आले होते. त्यानंतर युक्रेनच्या विविध भागांमध्ये रशियाकडून जबर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांसाठी रशियाने लढाऊ विमाने, ड्रोन्स व क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.

राजधानी किव्हसह

सोमवारी पहाटे राजधानी किव्हसह ओडेसा, सुमी, खार्किव्ह, मायकोलेव्ह, डिनिप्रोपेट्रोव्हस्क तसेच झायटोमिर या भागांमध्ये रशियाकडून ड्रोनहल्ले चढविण्यात आले. राजधानी किव्हमध्ये करण्यात आलेल्या ड्रोनहल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेल्या ड्रोन्सवर ‘फॉर बेलगोरोद’ असे लिहिल्याचा दावा युक्रेनी यंत्रणांनी केला. रशियाने या हल्ल्यांसाठी इराणी ड्रोन्सचा वापर केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात वीजकेंद्रे, इंधनसाठे तसेच इतर पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या प्रमुख शहरांसह जवळपास १०० भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला असून हे भाग अनिश्चित काळासाठी अंधारात गेल्याचे सांगण्यात येते.

राजधानी किव्हसह

ड्रोन हल्ल्यांनी युक्रेनला हादरा देणाऱ्या रशियन फौजांनी डोन्बासमधील बाखमत व सोलेदार या शहरांच्या भागात आगेकूच केल्याचेही समोर आले आहे. या शहरांनजिकची काही गावांवर रशियन सैन्याने ताबा मिळविला असून दोन्ही शहरांवरील ताब्यासाठी प्रखर संघर्ष सुरू असल्याची कबुली युक्रेनने दिली. त्याचवेळी दक्षिण युक्रेनमधील खेर्सनमध्ये युक्रेनी फौजांकडून सुरू असलेल्या प्रतिहल्ल्यांची तीव्रता कमी झाल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियन सैन्याने गेले काही दिवस युक्रेनी फौजांना नवा भाग मिळविण्यात यश मिळून दिलेले नाही. ही बाब रशियन मोहिमेसाठी महत्त्वाची ठरते, असा दावा पाश्चिमात्य माध्यमे व विश्लेषक करीत आहेत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनसह पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमे रशियाकडील लष्करी क्षमता संपल्याचे व रशियन सैन्य जेरीस आल्याचे दावे करीत होत्या. रशियन फौजांनी एकापाठोपाठ घेतलेली माघार व युक्रेनी लष्कराला मिळालेले यश या आधारावर हे दावे करण्यात येत होते. मात्र गेले काही दिवस दिवस युक्रेनी शहरांना भाजून काढत रशियाने आपली लष्करी ताकद युक्रेनसह जगाला दाखवून दिली आहे. तब्बल आठ महिने युक्रेनविरोधात संघर्ष सुरू असताना व काही धक्के बसले असतानाही रशियाने दाखविलेले हे सामर्थ्य युक्रेनमधील संघर्षाची व्याप्ती अधिक वाढविणारे ठरेल, असे दावे आता करण्यात येत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info