Breaking News

अफगाणी लष्कराच्या कारवाईत दोनशेहून अधिक दहशतवादी ठार – तालिबानच्या हल्ल्यात २८ जणांचा बळी

काबुल – गेल्या चोवीस तासात तालिबानने अफगाणिस्तानमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोट आणि गोळीबारांच्या घटनांमध्ये २८ जणांचा बळी गेला असून यामध्ये सात नागरिकांचा समावेश आहे. त्यानंतर अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईत २०३ दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये अल कायदामधील २२ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा देखील समावेश असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

दरम्यान, ‘अमेरिकेच्या सैन्यमाघारीच्या निर्णयामुळे तालिबान आणि पाकिस्तानातील त्यांचे संरक्षक चकीत झाले आहेत व त्यांच्यावर काही अवघड निर्णय घेण्याची वेळ ओढावली आहे. अफगाणिस्तानात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करायचे की हिंसेचा मार्ग स्वीकारायचा, हे तालिबान आणि त्यांच्या संरक्षकांनी ठरवायचे आहे. जर त्यांनी वाटाघाटी सोडून हिंसेचा पर्याय निवडला तर त्यांच्या वाट्याला दफनभूमीतली शांतता येईल’, असा इशारा अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी अमेरिकन मासिकासाठी लेख लिहिला आहे. ‘अमेरिकेची ही माघार अफगाणिस्तान, तालिबान आणि या क्षेत्रासाठी संधी आणि धोका, असे दोन पर्याय समोर ठेवणारी आहे. यापैकी योग्य पर्यायाची निवड केली तर अफगाणिस्तानात आणि पर्यायाने या क्षेत्रात शांतता व स्थैर्य निर्माण होईल. यासाठी तालिबानला हिंसाचार सोडून निवडणुकीला सामोरे जावे लागेल. अफगाणींच्या अर्थात महिला व अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचा आदर करावा लागेल’, याची आठवण राष्ट्राध्यक्ष गनी यांनी करून दिली.

पण तालिबानला अफगाणिस्तानातील शांततेपक्षाही देशाची सत्ता मिळविण्यामध्ये अधिक स्वारस्य असल्याची टीका राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केली. तसेच तालिबानने पुन्हा हिंसेचा मार्ग निवडला तरी अफगाणिस्तान पुन्हा १९९०च्या दशकात जाणार नाही, असा विश्‍वासही अफगाणी राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानातील सरकार आणि लष्कर पहिल्यापेक्षा अधिक सक्षम आहे. अमेरिकेच्या पूर्ण माघारीनंतरही आपल्या देशाच्या व जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष गनी यांनी केला. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यानेही तालिबानला संपविण्यासाठी आपले जवान सज्ज असल्याची घोषणा केली होती.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात लष्कराने लाघमान, गझनी, कंदहार, झाबूल, हेरात, हेल्मंड आणि बाघलान प्रांतांमध्ये तालिबानविरोधात मोठी कारवाई केली. यामध्ये १८१ तालिबानी ठार तर ८७ जण जखमी झाले. याशिवाय अफगाणी लष्कराने हेल्मंड प्रांतात केलेल्या विशेष मोहिमेत अल कायदाच्या २२ दहशतवाद्यांचा खातमा केला. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानी होते, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info