चीनच्या लेझर यंत्रणेमुळे पाणबुडीभेदी युद्धाचे स्वरुप बदलेल चिनी वृत्तसंस्थेचा दावा

चीनच्या लेझर यंत्रणेमुळे पाणबुडीभेदी युद्धाचे स्वरुप बदलेल चिनी वृत्तसंस्थेचा दावा

शांघाय – आपल्या संरक्षणसामर्थ्यात प्रचंड वाढ करणार्‍या चीनने नवी लेझर यंत्रणा विकसित केली आहे. या लेझरच्या सहाय्याने समुद्राच्या तळाशी दबा धरून बसलेल्या पाणबुडीला सहज शोधून काढता येते, असा दावा चीनच्या लष्कराशी संलग्न असलेल्या कंपनीने केला. यामुळे पाणबुड्यांवर हल्ले चढविणे अधिक सोपे होईल आणि पाणबुडी युद्धाचे स्वरूपच बदलेल, असे चिनी वृत्तसंस्थेने आपल्या बातमीत म्हटले आहे. तर सध्या संरक्षणक्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांकडे देखील अशी लेझर यंत्रणा नसल्याचा दावा चिनी कंपनीने केला.

चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’शी संलग्न असलेल्या ‘शांघाय इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टिक्स अँड फाईन मेकानिक्स’ (सीऑम) कंपनीच्या एका पथकाने या वर्षाच्या सुरुवातीला ‘साऊथ चायना सी’मध्ये सदर लेझरची चाचणी घेतली. जवळपास सहा महिने या चाचणीबाबत गोपनीयता राखल्यानंतर चीनच्या कंपनीने याविषयीची माहिती स्थानिक माध्यमांद्वारे उघड केली. ‘साऊथ चायना सी’च्या कुठल्या भागात ही चाचणी घेतल्याचे तपशील या कंपनीने जाहीर केलेले नाही. पण हिरवे आणि निळे अशा हलक्या लेझर बीमचा यावेळी वापर झाल्याची माहिती चिनी वृत्तसंस्थेने आपल्या बातमीतून दिली.

‘सीऑम’ कंपनीने एका छोट्या प्रवासी विमानातून ही चाचणी पूर्ण केली. समुद्रसपाटीपासून १६० मीटर खोलपर्यंत लेझरचा मारा करण्यात आला होता. ही प्राथमिक चाचणी असून येत्या काळात समुद्रसपाटीपासून ५०० मीटर खोलपर्यंत लेझरचा मारा करण्याची योजना या कंपनीने आखली आहे. सुर्यकिरणे देखील समुद्रसपाटीच्या २०० मीटर खोलपर्यंत प्रवास करू शकतात. त्यामुळे आपले लेझर सुर्यकिरणांपेक्षाही भेदक असल्याचा दावा चिनी वृत्तसंस्थेने केला.

याआधी चीनने लेझरच्या सहाय्याने समुद्राचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला होता. वर्षभरापूर्वी चीनच्या लष्कराने आणि एका कंपनीने सदर लेझर यंत्रणेची चाचणी घेतली होती. पण ‘सीऑम’ कंपनीची चाचणी ‘ऑप्टिकल सायन्स’ क्षेत्रातील मोठी घडामोड असल्याचा दावा चिनी कंपनी करीत आहे. यामुळे समुद्राच्या तळाशी रूतलेल्या पाणबुड्यांना शोधून काढणे सोपे जाईल, असे या कंपनीचे म्हणणे आहे. तर ही चाचणी पाणबुडीभेदी तंत्रज्ञानाला कलाटणी देणारी असल्याचा दावा चिनी विश्‍लेषकाने या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

सध्या कुठल्याही पाणबुडीला शोधून काढण्यासाठी ‘सोनार’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. संबंधित सागरी क्षेत्रात जहाजांची मोठी वर्दळ असल्याचे पाणबुडीतून निघाणारे विशिष्ट ध्वनी टिपणे अवघड होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूची पाणबुडी समुद्राच्या खोलातून सहज प्रवास करू शकते. अशावेळी ‘सीऑम’ कंपनीने विकसित केलेल्या लेझरने सज्ज असलेले विमान किंवा लेझरसह अंतराळात तैनात केलेल्या सॅटेलाईटच्या सहाय्याने सदर पाणबुडी शोधणे सोपे होईल, याकडे ऑस्ट्रेलियन विश्‍लेषक मनब्रता गुहा यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, शांघायस्थित ‘सीऑम’ कंपनीने विकसित केलेली सदर लेझर यंत्रणा चीनच्या संरक्षण सामर्थ्यात वाढ करणारी असल्याचा दावा गुहा यांनी केला. ‘अमेरिकेच्या पाणबुड्यांनी चीनच्या सागरी हद्दीत प्रवेश केला तर पुढे काय, अशी चिंता चीनला सतावित आहे. अशावेळी सदर लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चीनचे लष्कर अमेरिकेच्या पाणबुड्यांना हुडकून काढण्यात यशस्वी ठरेल’, असा इशारा गुहा यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info