अमेरिकेला सैन्यमाघारीची मुदत वाढवून देणार नसल्याचा तालिबानचा इशारा

बायडेन प्रशासनाने तालिबानसमोर शरणांगती पत्करल्याची हॅले यांची टीका

दोहा/वॉशिंग्टन – ‘31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली होती. अमेरिकेसाठी ही रेड लाईन आहे. पण या मुदतीनंतरही अमेरिका आणि ब्रिटनचे जवान अफगाणिस्तानात तैनात राहणार असतील तर त्यासाठी या दोन्ही देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहिन याने दिली. मात्र 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातील अमेरिकन्सना बाहेर काढणे अशक्य असून अमेरिका यासाठी अधिक वेळ लागेल, असे संकेत देत आहे. पण अमेरिकेला तशी परवानगी दिली जाणार नाही, असे जाहीर करून तालिबानने बायडेन प्रशासनाची कोंडी केली आहे. यामुळे बायडेन प्रशासनाने तालिबानसमोर सपशेल शरणांगती पत्करल्याचा आरोप अधिकच तीव्र होऊ शकेल.

तालिबानचा

अफगाणिस्तानात अमेरिकेचे 15 हजारांहून अधिक नागरिक अडकले आहेत. यापैकी जवळपास दहा हजार जणांना अफगाणिस्तानातून अन्यत्र पाठविल्याचा दावा अमेरिका करीत आहे. तर उर्वरित नागरिकांच्या माघारीबाबत बायडेन प्रशासन आणि पेंटॅगॉन देखील हमी द्यायला तयार नाही. काबुल विमानतळापर्यंत अमेरिकी नागरिकांना सुरक्षा पुरवू शकत नसल्याचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते.

फ्रान्सचे स्पेशल फोर्सेस काबुलमधून आपल्या नागरिकांसह अफगाणींनाही सुरक्षित विमानतळापर्यंत घेऊन दाखल होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, बायडेन प्रशासन आपल्याच नागरिकांची सुरक्षित माघार करू शकत नसल्याची टीका होत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील 31 ऑगस्टपर्यंत माघार शक्य नसल्याचे सांगून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मुदतवाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले होते.

अमेरिका आणि पाश्‍चिमात्य मित्रदेशांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे तालिबानचा प्रवक्ता शाहिन याने स्पष्ट केले. 31 ऑगस्टची मुदत अमेरिकेनेच निश्‍चित केली होती. या मुदतीनंतर अमेरिकेचे जवान अफगाणिस्तानात दिसले तर ते खपवून घेतले जाणार नाही’, असे तालिबानच्या प्रवक्त्याने बजावले. या धमकीमुळे बायडेन प्रशासनाची कोंडी झाली आहे.

याआधीच अफगाणिस्तानातील वेगवान सैन्यमाघारीच्या निर्णयासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्वावर टीका होत आहे. सैन्यमाघारीचा गोंधळ घालून बायडेन यांनी अमेरिकेच्या इतिहासातील परराष्ट्र धोरणाचा सर्वात मोठा अपमान ठरतो. या माघारीसह बायडेन यांनी आपल्या अकार्यक्षमतेचे भयानक प्रदर्शन केल्याचा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तर बायडेन प्रशासनाने तालिबानच्या दहशतवाद्यांसमोर शरणांगती पत्करल्याची जळजळीत टीका संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी केली.

अफगाणिस्तानच्या या अपयशासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर महाभियोग चालविण्यात यावा, अशी मागणी अमेरिकेत जोर पकडू लागली आहे. पण संपूर्ण जगाची सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या बायडेन यांच्यावर महाभियोग चालविण्यापेक्षा त्यांची हकालपट्टी करून लष्करी न्यायालयात चौकशी करावी, अशी मागणी ब्रिटनचे माजी लष्करी अधिकारी कर्नल रिचर्ड केंप यांनी केली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info