दुहेरी युद्धगुन्हे करणार्‍या हमासवरील इस्रायलचे हल्ले थांबणार नाहीत – इस्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा

दुहेरी युद्धगुन्हे करणार्‍या हमासवरील इस्रायलचे हल्ले थांबणार नाहीत – इस्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा
  • इस्लामिक जिहादचा वरिष्ठ कमांडर ठार
  • ओआयसीच्या बैठकीत इस्रायलवर टीका

जेरूसलेम/कैरो – ‘इस्रायली जनतेच्या सुरक्षेची खात्री पटल्याशिवाय इस्रायल शांत बसणार नाही. यापुढेही इस्रायलकडून गाझावर पूर्ण ताकदीने हल्ले सुरू राहतील. काहीही झाले तरी हमासवरील इस्रायलचे हल्ले थांबणार नाहीत’, अशी गर्जना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दुसर्‍या आठवड्यात पोहोचला आहे. आत्तापर्यंतच्या संघर्षात २०० हून अधिक पॅलेस्टिनी तर १० इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे.

इस्रायलचे हल्ले

इस्रायल आणि हमासमधील या घनघोर संघर्षाचे रुपांतर संहारक युद्धात होईल, अशी चिंता जगभरातून व्यक्त करण्यात येत आहे. प्रमुख देशांनी व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनेही इस्रायल व हमासला संघर्षबंदीचे आवाहन केले आहे. गाझावरील हल्ले थांबविण्यासाठी इस्रायलवर दडपण टाकले जात आहे. मात्र इस्रायलच्या पंतप्रधानांनी यासंदर्भात निर्णायक भूमिका स्वीकारली आहे. ‘दुहेरी युद्धगुन्हेगारी करणार्‍या हमासला याची किंमत चुकती करण्यास भाग पाडल्याखेरीज इस्रायल शांत बसणार नाही’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बजावले आहे.

‘हजारो रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा इस्रायली जनतेवर मारा आणि त्याचवेळी पॅलेस्टिनी जनतेचा मानवी ढाल म्हणून केलेला वापर, हे हमासचे दुहेरी युद्धगुन्हे ठरतात’, असा ठपका पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ठेवला. त्याचबरोबर इस्रायलने गाझातील हमासच्या ठिकाणांनाच लक्ष्य केल्याचे इस्रायली पंतप्रधानांनी ठासून सांगितले. अमेरिकेच्या विशेषदूतांसमोरही याचे पुरावे मांडल्याची माहिती नेत्यान्याहू यांनी दिली. त्याचबरोबर या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन देखील आपल्या पाठिशी असल्याचे नेत्यान्याहू यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या या घोषनेनंतर इस्रायली लष्कराने गाझापट्टीवरील हल्ले तीव्र केले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी केलेल्या कारवाईत इस्लामिक जिहादचा वरिष्ठ कमांडर ‘हुसाम अबू हारबीद’ ठार झाला. तर शुक्रवारच्या हल्ल्यातून बचावलेला हमासचा नेता ‘याह्या सिन्वर’ आणि ‘मोहम्मद दिएफ’ हे आपल्या निशाण्यावर असल्याचे इस्रायलच्या लष्कराने जाहीर केले. त्यामुळे हमासला मोठे धक्के दिल्याशिवाय हल्ले थांबणार नसल्याचे इस्रायली नेत्यांचे इशारे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत.

हमास व इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी देखील सोमवारच्या संध्याकाळपर्यंत इस्रायलच्या अश्दोद, ऍश्खेलॉन शहरांवर मोठ्या संख्येने रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यांमध्ये तीन इस्रायली जखमी झाले आहेत. याशिवाय पूर्व जेरूसलेमच्या शेख जराह भागात पॅलेस्टिनी कट्टरपंथियाने पोलीस चेकपोस्टवर तैनात असलेल्या इस्रायली जवानांवर मोटार आदळली. यामध्ये सात इस्रायली जवान जखमी झाले आहेत. काही तासांपूर्वी इस्रायली जवानाला भोसकण्याचा प्रकारही घडला होता.

इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधील या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची (ओआयसी) रविवारी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत इस्रायल गाझातील पॅलेस्टिनी जनतेला लक्ष्य करीत असल्याचा आरोप, तुर्की, इराण, पाकिस्तान या देशांनी केला. तसेच इस्रायलच्या हल्ल्यांपासून पॅलेस्टिनींच्या बचावासाठी ‘ओआयसी’चे स्वतंत्र लष्करी पथक जेरूसलेममध्ये तैनात करण्याचा प्रस्ताव तुर्कीने मांडला. तुर्कीच्या या प्रस्तावाला पाकिस्तानने त्वरीत समर्थन दिले. इतर देशांनी मात्र इतकी जहाल भूमिका न घेता इस्रायल व पॅलेस्टिनींना संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी सौदी, इजिप्त व कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. गाझातील संघर्षाबाबत या तीनही आखाती देशांची भूमिका अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी समजून घेतल्याचे सांगितले जाते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info