रशियाचे लचके तोडू पाहणार्‍यांचे दात त्यांच्याच घशात घालू – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा खरमरीत इशारा

रशियाचे लचके तोडू पाहणार्‍यांचे दात त्यांच्याच घशात घालू – राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा खरमरीत इशारा

मॉस्को – ‘प्रत्येक जण रशियाचे लचके तोडण्याचा किंवा तुकडे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. जर कधी हे झाले किंवा जेव्हा होईल, त्यावेळी रशिया असा प्रयत्न करणार्‍यांचे दात त्यांच्याच घशात घातल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रतिस्पर्धी देश रशियाचा प्रचंड आकार व त्याच्याकडे असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर डोळा ठेऊन आहेत. त्यामुळे रशिया अधिक सामर्थ्यशाली होत असताना त्याचे पंख कातरण्यासाठी कारणे शोधली जात आहेत’, असा खरमरीत इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. गेल्या काही महिन्यात रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर हा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दुसर्‍या महायुद्धात रशियाने जर्मनीच्या नाझी राजवटीचा पराभव केला होता. यावेळी बळी गेलेल्या रशियन जवानांना आदरांजली वाहण्यासाठी ‘व्हिक्टरी ऑर्गनायझिंग कमिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या विरोधकांना पुन्हा एकदा ताकदीची जाणीव करून दिली. बैठकीदरम्यान त्यांनी रशियन सम्राट ‘झार अलेक्झांडर ३’ यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. ‘रशियाचा अतिप्रचंड आकार सर्वांना घाबरवून टाकणारा आहे, असे आपल्या सम्राटाने म्हटले होते’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. रशियाने आपली एक तृतियांश क्षमता गमावली असली, तरी इतर अनेक देशांसाठी रशिया आजही प्रचंड मोठा देश आहे, असेही पुतिन यांनी यावेळी बजावले.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाला विरोध करणार्‍या पाश्‍चात्य देशांना इशारा देण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. दोन आठवड्यांपूर्वी, व्हिक्टरी डेनिमित्त राजधानी मॉस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लष्करी संचलनादरम्यान पुतिन यांनी रशिया कोणत्याही मुद्यावर माघार घेणार नसल्याचे खडसावले होते.

गेल्या काही महिन्यात रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. अमेरिकने आपल्यावर झालेल्या सायबरहल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचा दावा करून निर्बंध लादले आहेत. त्याचवेळी पुतिन यांचे विरोधक असणार्‍या ऍलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर झालेली कारवाई, ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनी व युक्रेनविरोधातील कारवायांच्या मुद्यावरूनही आक्रमक निर्णय घेतले आहेत. युरोपिय देशांनीही नॅव्हॅल्नी प्रकरण व युक्रेनच्या मुद्यावर रशियाविरोधी भूमिका घेऊन निर्बंध लादले आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info