रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हसह झॅपोरिझिआवर क्षेपणास्त्र व ड्रोन्सचा मारा

मॉस्को/किव्ह – क्रिमिआतील ड्रोनहल्ला व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधातील अटक वॉरंटला रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. युक्रेनची राजधानी किव्हसह झॅपोरिझिआवर क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा जबरदस्त मारा करण्यात आला. गेल्या दीड महिन्यात रशियाने युक्रेनवर ड्रोन्स व क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची ही तिसरी वेळ ठरते. बाखमतसह लुहान्स्क, खार्किव्ह व डोनेत्स्क क्षेत्रात प्रखर संघर्ष सुरु असतानाच रशियाने केलेले हे हल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात.

किव्हसह झॅपोरिझिआवर

बुधवारी रशियाने इराणच्या शाहेद ड्रोन्सच्या सहाय्याने राजधानी किव्ह व नजिकच्या परिसरात हल्ले केले. या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येते. इराणी ड्रोन्सबरोबरच रशियन ड्रोन्सचाही वापर करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या हल्ल्यात रशियाने २०पेक्षा जास्त ड्रोन्सचा वापर केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली. बहुतांश ड्रोन्स नागरी वस्तीत पडल्याचे दावेही करण्यात आले आहेत.

किव्हसह झॅपोरिझिआवर

किव्हवरील ड्रोनहल्ल्यापाठोपाठ झॅपोरिझिआ शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. रशियाने किमान १० क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती युक्रेनने दिली. यातील एक क्षेपणास्त्र मोठ्या इमारतीवर पडून आग लागल्याचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. रशियाने केलेल्या ड्रोन तसेच क्षेपणास्त्र हल्ल्यांवर युक्रेन व अमेरिकेने टीकास्त्र सोडले आहे.

रशिया अत्यंत निर्घृणपणे हल्ले चढवित आहे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली. हे हल्ले रशियन दहशतवादाचा भाग आहेत, असे टीकास्त्रही झेलेन्स्की यांनी सोडले. तर एक दिवस आधी शांतीच्या गोष्टी करणाऱ्या रशियाने क्रूरपणे युक्रेनी वस्त्यांवर हल्ले चढविले आहेत, अशी टीका अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलने केली. रशियाच्या या आक्रमणाविरोधात युक्रेनला करण्यात येणारे सहाय्य अमेरिका कायम ठेवेल, अशी ग्वाही कौन्सिलच्या प्रवक्त्या ॲड्रिअन वॅटसन यांनी दिली.

किव्हसह झॅपोरिझिआवर

रशियाने केलेल्या या हल्ल्यांपूर्वी युक्रेनने क्रिमिआ प्रांतातील बंदरावर घातपाती हल्ला केल्याचे समोर आले आहे. सेव्हॅस्टोपलवर केलेल्या या हल्ल्यात रशियन युद्धनौका तसेच तळाला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते. रशियाची काही क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा युक्रेनी माध्यमांनी केला आहे. मात्र रशियाने सदर दावा फेटाळला. युक्रेनच्या तीन ‘नेव्हल ड्रोन्स’नी हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र रशियन यंत्रणांनी तो उधळल्याचा दावा स्थानिक गव्हर्नरनी केला.

युक्रेनने यापूर्वीही क्रिमिआतील रशियन तळांना सातत्याने लक्ष्य केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी याची गंभीर दखल घेऊन क्रिमिआतील सुरक्षायंत्रणा भक्कम करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वीच पुतिन यांनी क्रिमिआला भेटही दिली होती. त्यानंतर युक्रेनी तुकड्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याने लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान, बाखमत शहरातील संघर्षात युक्रेन लवकरच नव्या लष्करी तुकड्या तैनात करील, असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info