तालिबानच्या भीषण हल्ल्यांमध्ये अफगाणी लष्कराचे 150 जवान ठार

तालिबानच्या भीषण हल्ल्यांमध्ये अफगाणी लष्कराचे 150 जवान ठार

काबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानात घडविलेल्या हल्ल्यांमध्ये किमान दीडशे अफगाणी जवानांचा बळी गेला. अफगाण सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली. याशिवाय तालिबानने आणखी दोन जिल्ह्यांचा ताबा घेऊन आपली पकड मजबूत केल्याच्या बातम्या आहेत. तर गेल्या 24 तासात आपल्या लष्कराच्या कारवाईत तालिबानच्या 126 दहशतवाद्यांना ठार केल्याची घोषणा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केली आहे.

हल्ल्यांमध्ये

अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले वाढत चालल्याची माहिती समोर येत आहे. तालिबानचे दहशतवादी अफगाणी संरक्षणदलाच्या जवानांना लक्ष्य करीत आहेत. सध्या अफगाणिस्तानच्या 34 पैकी 26 प्रांतांमध्ये अफगाण लष्कर आणि तालिबानमध्ये संघर्ष पेटला आहे. 133 जिल्ह्यांवर अफगाण सरकार तर 75 जिल्ह्यांवर तालिबानचे पूर्ण नियंत्रण आहे. याशिवाय 189 जिल्ह्यांसाठी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

या संघर्षामध्ये अफगाणी संरक्षणदलांना मोठी जीवितहानी सोसावी लागल्याचे दावे केले जात होते. पण त्याचे तपशील समोर आले नव्हते. पण सोमवारी अफगाणी सरकारच्या अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मोठी माहिती उघड केली. गेल्या चोवीस तासातील संघर्षात अफगाणी लष्कराचे किमान दीडशे जवान मारले गेले आहेत. कोणत्या प्रांत किंवा जिल्ह्यातील कारवाईत अफगाणी लष्कराला एवढी मोठी जीवितहानी सहन करावी लागली, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हल्ल्यांमध्ये

याशिवाय तालिबानने गेल्या चोवीस तासात दोन जिल्ह्यांचा ताबा घेतला. रविवारी फरयाब प्रांतातील कैसर तर सोमवारी पहाटे घोर प्रांतातील शाहराक जिल्हे तालिबानने नियंत्रणाखाली आणले. सध्या अफगाणिस्तानचा 19 टक्के भूभागावर तालिबानची राजवट असल्याचा दावा केला जातो. तर 47 टक्के भागावरच अफगाण सरकारची सत्ता आहे. अमेरिका व नाटो लष्कराच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर तालिबानचे हल्ले वाढले आहेत.

तर तालिबानच्या विरोधात आपल्याला मोठे यश मिळत असल्याचा दावा अफगाणी लष्कर करीत आहे. गेल्या चोवीस तासात 15 प्रांतांमधील कारवाईत तालिबानचे 126 दहशतवादी ठार तर 79 जखमी झाल्याची माहिती अफगाण संरक्षण मंत्रालयाने दिली. नांगरहार, खोस्त, मैदान वरदाक, लोगार, पाकतिया, गझनी, उरूझगन, बदघीस, फरयाब, बघलान, कुन्दूझ आणि हेल्मंड या प्रांतात ही कारवाई केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान, अफगाणिस्तानातील हा संघर्ष तीव्र होत असताना, तालिबानने सोमवारी एक पत्रक जारी केले. ‘गेली 20 वर्षे अफगाणिस्तानातील संघर्षात अमेरिका आणि नाटोच्या लष्करासाठी दुभाषी, हमाल किंवा हेर म्हणून सहाय्य करणार्‍या अफगाणींना काहीच इजा करणार नाही. अशा अफगाणींनी देश सोडून जायची आवश्यकता नाही. फक्त त्यांनी आपल्या जुन्या कर्मांसाठी तालिबानसमोर पश्‍चात्ताप व्यक्त करावा’, असे तालिबानने जाहीर केले. तालिबानची ही घोषणा म्हणजे अफगाणींसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानची जुलमी राजवट येणार असल्याचे या धमकीतून उघड होत असल्याचे बोलले जात आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info