वॉशिंग्टन – सैन्य माघारी घेतले तरी अमेरिका अफगाणिस्तानवरचे नियंत्रण सोडणार नाही, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिली होती. याला दुजोरा देणारी माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिली आहे. सिनेटच्या ‘आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटी’समोर बोलताना संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी अफगाणिस्तानातील अमेरिकेची हवाई मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट केले. यासाठी आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर असलेल्या विमानांचा वापर केला जात आहे, असे ऑस्टिन म्हणाले. अमेरिकेवर हल्ल्याचे कारस्थान आखणार्या दहशतवाद्यांवर आधीच हल्ले चढविले जातील, अशी ग्वाही यावेळी संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी दिली.
अफगाणिस्तानची राजधानी काबुल किंवा इतर महत्त्वाच्या शहरांच्या दिशेने आगेकूच करणार्या तालिबानवर हवाई हल्ले चढविले जातील, अशी बातमी अमेरिकेच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली होती. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची परवानगी घेणार असल्याचे, अमेरिकी लष्कराच्या अधिकार्यांनी या वर्तमानपत्राला सांगितले होते. तालिबानवरील या हल्ल्यांसाठी आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर तैनात विमानांचा वापर केला जाईल, असे या अधिकार्यांचे म्हणणे होते.
आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटीसमोरील सुनावणीत ऑस्टिन यांच्याकडे या बातमीबाबत विचारणा करण्यात आली. संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी या बातमीला थेट दुजोरा देण्याचे टाळले. पण अफगाणिस्तानातील अमेरिकेची ‘इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रिकॉनिसन्स – आयएसआर’ ही हवाई मोहीम सुरू झाल्याचे ऑस्टिन यांनी स्पष्ट केले.
‘‘अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपले जवान माघारी घेण्यास सुरुवात केली, त्याचवेळी या देशात हवाई मोहीम सुरू केली. आखाती देशांमधून ही ‘आयएसआर’ मोहीम राबविली जात आहे’’, अशी माहिती ऑस्टिन यांनी दिली. त्याचबरोबर आखातातून अफगाणिस्तान, अशा दीर्घ पल्ल्याच्या हवाई मोहिमेचे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमधील तळांचा वापर करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन म्हणाले.
अफगाणिस्तानचा शेजारी असलेल्या पाकिस्तानात अमेरिकेला तळ मिळालेला आहे का, त्याचा वापर अमेरिका करीत आहे का, याबाबतची माहिती देण्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी टाळले. आधीच्या काळात पेंटॅगॉनच्या अधिकार्यांनी पाकिस्तानातील तळाबाबत माहिती उघड केल्यानंतर, पाकिस्तानच्या सरकारवरील दडपण वाढले होते. पुन्हा तसे होऊ नये, यासाठी संरक्षणमंत्री ऑस्टिन सावधानता दाखवित असल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |