इस्रायलचे इशारे इराणने अधिक गांभीर्याने घ्यावे – इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे माजी प्रमुख

इस्रायलचे इशारे इराणने अधिक गांभीर्याने घ्यावे – इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे माजी प्रमुख

तेल अविव – काही दिवसांपूर्वी निवृत्त झालेले इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे माजी प्रमुख योसी कोहेन यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक उलगडा केला. कोहेन यांनी या मुलाखतकारांना शक्य झाल्यास, इराणच्या नातांझ अणुप्रकल्पाच्या भूमिगत तळघराची सफर घडविण्याची चकीत करणारी ऑफर दिली. तसेच ‘इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, हा इस्रायलचा इशारा इराणने अधिक गांभीर्याने घ्यायला हवा होता’, असे सांगून इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या स्फोटासाठी इस्रायल जबाबदार असल्याचे संकेत दिले. याशिवाय इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसेन फखरीझादेह यांची हत्या घडविल्याची कबुलीही कोहेन यांनी या मुलाखतीत दिली.

इस्रायली गुप्तचर यंत्रणा

गेल्या महिन्यात योसी कोहेन यांचा मोसादच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला. गेली पाच वर्षे इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे नेतृत्व करणारे कोहेन मोसादचे अत्यंत धाडसी संचालक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीत मोसादने इराणमध्ये घुसून तसेच अन्य देशांमध्येही जबरदस्त कारवाया केल्या होत्या. यात इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोका ठरणार्‍या इराण, हिजबुल्लाहचे नेते व दहशतवाद्यांचा काटा काढणार्‍या मोहिमांचा समावेश होता. इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना, कोहेन यांनी मोसादच्या काही कारवायांची सूचक शब्दात माहिती दिली.

इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधीचे पुरावे, नातांझ अणुप्रकल्पातील स्फोट, फखरीझादेह यांची हत्या, हिजबुल्लाहमधील मोसादचे एजंट्स आणि युएईबरोबरचे सहकार्य या विषयांवर कोहेन यांनी प्रकाश टाकला. ‘इराणच्या अणुप्रकल्पांशी मी चांगलाच परिचित आहे आणि संधी मिळाली तर तुम्हालाही मी नातांझ अणुप्रकल्पाची सफर घडवून आणू शकतो. तसेच ज्या भूमिगत तळघरात सेंट्रिफ्यूजेसवर काम चालायचे, ते देखील तुम्हाला दाखवू’, असे कोहेन यांनी मुलाखत घेणार्‍या महिला पत्रकारांना सांगितले. त्याचवेळी नातांझमधील सेंट्रिफ्यूजेसचे काम पहिल्यासारखे चालत नसल्याची महत्त्वाची माहिती यावेळी कोहेन यांनी दिली.

इस्रायली गुप्तचर यंत्रणा

कोहेन यांनी उघडपणे नातांझमधील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली नाही, असे मुलाखतकार इलाना डायन यांनी स्पष्ट केले. पण ‘इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, हा इस्रायलचा इशारा इराणने अधिक गांभीर्याने घ्यायला हवा होता’, असे सांगून कोहेन यांनी अप्रत्यक्षपणे नातांझमधील स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचे दिसत आहे. इस्रायलमधील प्रसिद्ध शोधपत्रकार आणि मुलाखतकार इलाना डायन यांनी देखील या मुलाखतीत नातांझ प्रकल्पात कसा स्फोट घडविला, याचे कथानक या मुलाखतीतच सांगितले.

नातांझ प्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेस उभारलेल्या संगमरवरी फलाटाखाली मोठ्या प्रमाणात स्फोटके पेरलेली होती. स्फोटकांनी सज्ज असलेले संगमरवर नातांझसाठी वापरले जातील, याची काळजी फार आधीच घेण्यात आली होती. यामुळे इराणच्या अणुप्रकल्पावर फार आधीपासून काम सुरू होते, असे उघड होत आहे. मोसादच्या माजी प्रमुखांनी देखील इराणच्या अणुकार्यक्रमावर काम करणार्‍या फखरीझादेह यांच्यावर गेली कित्येक वर्षे नजर होती, असे स्पष्ट केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फखरीझादेह यांची हत्या घडविण्याआधी मोसादचे एजंट्स अनेकवेळा त्यांच्या जवळ पोहोचले होते, अशी माहिती कोहेन यांनी दिली.

‘इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या प्रत्येक शत्रूला ठार केले जात नाही. काही घटनांमध्ये हा शत्रू स्वत:च्या भूमिकेत बदल करायला तयार असेल तर मग त्याला जीवनदान दिले जाते आणि त्यांचा वापर केला जातो’, असे कोहेन म्हणाले. याशिवाय ‘जानेवारी 2018 मध्ये इराणची राजधानी तेहरानमधील गोदामातून अणुकार्यक्रमासंबंधीची 50 हजार कागदपत्रे आणि 163 डिस्क मिळविण्याचे काम सात तास सुरू होते. यासाठी 32 तिजोर्‍या तोडण्यात आल्या. मध्यरात्री केलेल्या या कारवाईची माहिती सकाळी इराणच्या यंत्रणांकडे पोहोचेपर्यंत सारी कागदपत्रे डिजिटली मोसादच्या मुख्यालयात पोहोचली होती. यामध्ये इस्रायलबाहेरील 20 एजंट्स सहभागी होते. हे सर्व एजंट्स आजही सुरक्षित आहेत’, असे कोहेन म्हणाले.

तर गाझाला पुरविण्यात येणार्‍या आर्थिक सहाय्याबाबत आपले आडाखे चुकल्याची कबुली कोहेन यांनी दिली. ‘गाझातील पॅलेस्टिनींना चांगले जीवनमान मिळाले, तर इस्रायलविरोधातील त्यांचा द्वेष कमी होईल, ते युद्धाची भाषा सोडतील, असे मला वाटत होते. म्हणून कतारमार्फत गाझातील पॅलेस्टिनींना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी मी प्रयत्न केले. पण गाझाला अर्थसहाय्य पुरविण्याचा माझा निर्णय चुकला’, असे कोहेन यांनी प्रांजळपणे मान्य केले. या मुलाखतीत कोहेन यांनी इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या धोरणांचे समर्थन केले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info