तेल अविव – ‘इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सुरू असलेले प्रयत्न म्हणजे दुसरेतिसरे काही नसून, इस्रायलच्या विनाशाची कामना करण्यासारखे ठरते. यामुळे इस्रायलच नाही, तर जगाचाही विनाश होईल’, अशा जळजळीत शब्दात अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर हल्ला चढविला.
इस्रायलच्या भेटीवर आलेल्या निक्की हॅले यांनी इस्रायली नेत्यांशी चर्चा करून त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हॅले यांनी इस्रायलमध्ये नव्याने सत्तेवर आलेले सरकार आणि विरोधी पक्ष या सर्वांचे इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत एकमत असल्याचे स्पष्ट केले. इराणचा अणुकार्यक्रम म्हणजे इस्रायलसाठी मृत्यूघंटा ठरते, असे इस्रायलचे नेते एकमुखाने सांगत असताना, अमेरिकेचे बायडेन प्रशासन मात्र इराणबरोबरील अणुकरार नव्याने लागू करण्याच्या तयारीत आहे, यावर निक्की हॅले यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच याच्या भीषण परिणामांची जाणीव हॅले यांनी करून दिली आहे.