अमेरिकेकडून रशियन इंधनाच्या आयातीवर बंदीचे संकेत

वॉशिंग्टम/मॉस्को – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन कोणत्याही क्षणी रशियातून आयात होणार्‍या इंधनावर बंदीची घोषणा करण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील वरिष्ठ सिनेटर्स तसेच व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र युरोपिय देशांनी रशियन इंधनावर बंदी टाकण्यास नकार दिला आहे. जर्मनीच्या चॅन्सेलरनी याबाबत ठाम भूमिका घेतली असून सध्या युरोपिय देशांकडे इंधनासाठी दुसरा पर्याय नसल्याचे सांगून याबाबत आपले अमेरिकेशी मतभेद असल्याचे उघड केले आहे.

इंधनाच्या आयातीवर बंदी

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून पाश्‍चिमात्य देशांकडून रशियाविरोधात निर्बंधांचा मारा सुरू आहे. रशियाच्या वित्त, बँकिंग, संरक्षण, गुंतवणूक, अंतराळ, तंत्रज्ञान यासह बहुतांश क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र यातून इंधनक्षेत्राला वगळण्यात आले होते. रशिया हा जगातील तिसर्‍या क्रमाकांचा इंधन उत्पादक देश असून अमेरिकेसह युरोपिय देशांना मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. अमेरिकेच्या इंधन आयातीपैकी तीन टक्के इंधन तसेच पेट्रोलियम उत्पादने रशियातून आयात केली जातात.

इंधनाच्या आयातीवर बंदी

युरोपिय देशांच्या इंधनाच्या गरजेपैकी जवळपास ४० टक्के इंधन रशियाकडून पुरविण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांमध्ये रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी टाकण्यावरून जोरदार चर्चा सुरू होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की सातत्याने रशियन इंधनाच्या आयातीवर बंदीची मागणी करीत होते. इंधनातून मिळणार्‍या पैशांच्या बळावर रशिया युक्रेनवर हल्ले चढवित आहे, असा आरोपही झेलेन्स्की यांनी केला होता.

इंधनाच्या आयातीवर बंदी

मात्र रशियन इंधनआयातीवर बंदी टाकल्यास इंधनाच्या दरांमध्ये होणारी वाढ व त्याचे अमेरिका तसेच युरोपातील अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यामुळे पाश्‍चिमात्य देशांकडून निर्बंधांबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र अमेरिकेच्या संसदेत यासंदर्भातील मागणी तीव्र झाली होती. संसद सदस्यांनी ‘रशिया ऑईल बॅन’संदर्भातील विधेयकही संसदेत मंजूर केले. त्यामुळे बायडेन प्रशासनावरील दडपण वाढल्याचे मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून रशियन इंधनाच्या आयातीवरील बंदीबाबत होणारी घोषणा महत्त्वाची ठरते. रशियन अर्थव्यवस्थेला हादरा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत व्हाईट हाऊसमधील सूत्रांनी दिले आहेत.

मात्र अमेरिका एकटाच रशियन इंधनावर बंदी घालणार असून युरोपिय देशांचा असणारा विरोध कायम आहे. युरोपिय महासंघातील प्रमुख देश असलेल्या जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ‘युरोपने जाणुनबुजून रशियाकडून होणार्‍या इंधनपुरवठ्याला निर्बंधांमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या काळात रशियाकडून युरोपला होणारा इंधनपुरवठा इतर मार्गांनी पूर्ण करून घेणे व ऊर्जेची गरज भागवणे शक्य नाही. युरोपियन जनतेच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच सार्वजनिक उपक्रमांसाठी इंधन आवश्यक आहे’, अशा शब्दात चॅन्सेलर शोल्झ यांनी रशियन इंधनावर बंदीची शक्यता फेटाळून लावली.

English   ” ]   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info