तैपेई/बीजिंग – तैवानच्या हवाईहद्दीत प्रवेश करून सुरक्षा धोक्यात आणणार्या चिनी विमानाने माघारी फिरावे, अन्यथा याच्या परिणामांसाठी फक्त तेच जबाबदार असतील, असा खरमरीत इशारा तैवानच्या हवाईदलाने दिला. मंगळवारी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) तब्बल २८ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. ही तैवानच्या हद्दीतील चीनची आत्तापर्यंतची सर्वात मोठी हवाई घुसखोरी ठरते. अमेरिकेसह प्रमुख देशांनी ‘जी७’ व ‘नाटो’च्या बैठकीत चीनवर टीकास्त्र सोडून तैवानला उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे बिथरलेल्या चीनने ही कारवाई केली असावी, असे संकेत मिळत आहेत.
मंगळवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास ‘पीएलए’कडून तैवानच्या हद्दीतील घुसखोरीला सुरुवात झाल्याची माहिती तैवानच्या हवाईदलाने दिली. पुढच्या चार तासांच्या अवधीत चीनच्या २८ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली, असे तैवानी हवाईदलाच्या अधिकार्यांनी म्हटले आहे. घुसखोरी करणार्या चीनच्या विमानांमध्ये ‘शांक्सी वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’सह ‘शांक्सी वाय-८ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर एअरक्राफ्ट’ ‘शिआन एच-६ बॉम्बर्स’(४), ‘शांक्सी केजे-५०० एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग ऍण्ड कंट्रोल एअरक्राफ्ट’(२), ‘शेनयांग जे-१६ फायटर जेट्स’(१४) व सहा ‘शेनयांग जे-११ फायटर जेट्स’चा समावेश होता. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करून याचे तपशील दिले.
जून महिन्यात चीनच्या विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी करण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. यापूर्वी ३, ४ व १४ जूनला चीनच्या विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. एकाच दिवसात अवघ्या चार तासांच्या अवधीत तब्बल २८ विमाने पाठवून चीनने तैवानवरील दडपण अधिक वाढविले आहे. यापूर्वी मार्च व एप्रिल महिन्यात चीनने २० तसेच त्याहून अधिक विमानांच्या सहाय्याने तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले होते. ही सातत्याने करण्यात येणारी घुसखोरी चीनने तैवानविरोधात सुरू केलेल्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा भाग ठरतो.
काही दिवसांपूर्वीच तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी ऑस्ट्रेलियाला यासंदर्भात इशारा दिला होता. त्यावेळी केलेल्या वक्तव्यात, तैवान गेली काही वर्षे चीनच्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा सामना करीत असल्याकडे लक्ष वेधले होते. २०१० नंतरच्या दशकात चीनने याचा वापर सुरू केला असून, विमानांबरोबरच शेकडो सशस्त्र मच्छिमारी बोटींचा समावेश असलेल्या ‘नेव्हल मिलिशिआ’चाही वापर करण्यात येत आहे. तैवानच्या संरक्षणदलांना त्रास देऊन कायम दडपणाखाली ठेवणे हा त्याचा मुख्य उद्देश मानला जातो.
मंगळवारी चिनी विमानांच्या घुसखोरीदरम्यात चिनी वैमानिक व तैवानच्या अधिकार्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्याचेही समोर आले आहे. चिनी वैमानिकांनी तैवानच्या हवाईदलाला, आमचा नियमित सराव सुरू आहे; जा थोडा वेळ पुस्तक वाचा, असे सुनावल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. तर, तैवानच्या अधिकार्यांनी घुसखोरी करणार्या चिनी विमानांच्या वैमानिकांना, संभाव्य दुर्घटना व परिणामांसाठी तेच जबाबदार असतील, असा इशारा दिल्याचे समोर आले आहे.
काही विश्लेषकांनी चिनी विमानांची घुसखोरी ‘जी७’ व ‘नाटो’च्या बैठकीत चीनविरोधात घेण्यात आलेल्या भूमिकेला प्रत्युत्तर देण्याचा भाग असल्याचा दावा केला आहे. या बैठकीत जी७च्या सदस्यदेशांनी तैवानला पाठिंबा जाहीर केला होता. त्याचे तैवानने मनापासून स्वागत केले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |