Breaking News

यापुढील युद्ध फारच वेगळे असेल – अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

पर्ल हार्बर-हिकॅम – ‘अमेरिका आणि मित्रदेशांनी नव्या प्रकारच्या युद्धासाठी सज्ज रहावे. कारण याआधी आपण जे काही युद्ध लढलो आहोत, त्यापेक्षा येत्या काळातील युद्धाचे स्वरुप फारच वेगळे असेल. यापुढे लष्कर, नौदल, हवाईदल यांच्याबरोबर अंतराळ आणि सायबर क्षेत्रातही अमेरिकेला संभाव्य संघर्षासाठी तयार रहावे लागेल व त्यासाठी मोठे बदल करावे लागतील’, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला. संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी थेट उल्लेख करायचा टाळला असला तरी अमेरिकेच्या सुरक्षेला चीनपासून धोका असल्याचे अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे मावळते प्रमुख ऍडमिरल फिलिप डेव्हिडसन यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री यांनी नुकतीच इंडो-पॅसिफिक कमांडच्या हवाई बेटावरील पर्ल हार्बर-हिकॅम तळाला भेट दिली. इंडो-पॅसिफिकच्या कमांडची सूत्रे आतापर्यंत ऍडमिरल डेव्हिडसन यांच्याकडे होती. पण शनिवारपासून ती सूत्रे ऍडमिरल जॉन ऍक्विनो यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना, संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी अमेरिकेच्या संरक्षणाकडे नव्या दृष्टीने पहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.

‘गेली दोन दशके आपण जुन्या पद्धतीने युद्ध लढलो आहोत. पण यापुढच्या नव्या युद्धांसाठी अमेरिकेला आपल्या संरक्षणदलांमध्ये मोठे बदल करावे लागतील. यासाठी आपल्याला अतिप्रगत तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. तसेच विचार, निर्णयप्रक्रिया आणि त्यावरील कारवाईचा वेग अतिशय वाढवावा लागेल’, असे संरक्षणमंत्री ऑस्टिन म्हणाले. लष्कर, नौदल, हवाईदल तसेच अंतराळ आणि सायबर क्षेत्रातील आघाडीवर अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेच्या कामाच्या पद्धतीत बदल करावे लागणार असल्याचे ऑस्टिन यांनी सुचविले.

या भविष्यातील युद्धासाठी अमेरिकेला नवी क्षमता विकसित करावी लागेल, असे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सुचविले. पण नेमक्या कुठल्या देशाविरोधात अमेरिकेला ही युद्धाची तयारी करावी लागेल किंवा कोणत्या देशाकडून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहे, याचा स्पष्टपणे उल्लेख करण्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी टाळले. पण इंडो-पॅसिफिक कमांडचे मावळते कमांडर ऍडमिरल डेव्हिडसन यांनी चीन हा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बजावले.

‘अमेरिका आणि चीनमध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सामरिक वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू असल्याचे बोलले जाते. पण ही अमेरिका व चीनमधील स्पर्धा नसून मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी लोकशाहीवादी अमेरिका आणि हुकूमशाही कम्युनिस्ट पक्षाखाली असलेल्या चीनमधील स्पर्धा आहे’, अशा परखड शब्दात ऍडमिरल डेव्हिडसन यांनी चीनवर निशाणा साधला. या क्षेत्रात शांतता ठेवायची असेल तर अमेरिकेला युद्ध करून ते जिंकावेच लागेल, असेही डेव्हिडसन म्हणाले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info