सिरियातील हिजबुल्लाहच्या तळावर इस्रायलचे हल्ले – सिरियन माध्यमाचा दावा

सना – गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवरील कारवाईला काही तास होत नाही, तोच इस्रायलने सिरियातील हिजबुल्लाहच्या तळावर हल्ले चढविले. इस्रायलच्या रणगाड्यांनी सिरियाच्या गोलान भागात चढविलेल्या या हल्ल्यात लष्कराचा तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती सिरियन माध्यमांनी दिली. इराणचा पाठिंबा असलेली हिजबुल्लाह या तळाचा वापर इस्रायलच्या विरोधात करीत होती, असा आरोप करण्यात येत होता.

सिरियाच्या दक्षिणेकडील कुनित्रा प्रांतात गुरुवारी पहाटे हल्ले झाले. येथील अल-काहतानिया गावातील सिरियन लष्कराच्या चौकीवर इस्रायली रणगाड्यांनी हल्ले चढविल्याची बातमी स्थानिक माध्यमाने दिली. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबाबतचे तपशील उघड झालेले नाहीत. सीमेपासून अवघ्या १५० मीटर अंतरावर असलेल्या या चौकीचे नियंत्रण सिरियन लष्कराच्या नाईंटिन्थ ब्रिगेडकडे असल्याचा दावा केला जातो.

पण गेल्या काही वर्षांमध्ये सिरियातील गृहयुद्धाचा फायदा घेऊन इराण तसेच इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने या ठिकाणी तळ ठोकल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. हिजबुल्लाहचा कमांडर जवाद हाशेम या तळाला वरचेवर भेट देत असल्याची माहिती समोर येत आहे. जवाद हा हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर हाजी हाशेमचा मुलगा असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी हल्ला झाला त्यावेळी जवाद हाशेम उपस्थित होता का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण तसे झाले तर सिरियातील हिजबुल्लाहच्या संघटनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

इस्रायलने सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरील कारवाईचा इशारा गेल्या महिन्याच्या अखेरीस दिला होता. इस्रायलच्या ड्रोन्सनी सिरियाच्या गोलान भागात जवाद हाशेमचा फोटो असलेली पत्रके टाकली होती. ‘हिजबुल्लाह तुम्हा सिरियन जनतेचा वापर करीत आहे’, असा इशारा या पत्रकात इस्रायलने दिला होता. हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याआधी सिरियन जनतेला इशारा देण्यासाठी इस्रायलने अशाप्रकारे ड्रोन्सच्या सहाय्याने पत्रके सोडल्याचे समोर आले होते. त्यानंतर इस्रायलने सदर ठिकाणांवर हल्ले चढविले होते.

सिरियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या गोलान टेकड्यांमधील इराण, हिजबुल्लाह तसेच इराणसंलग्न गटांच्या हालचाली खपवून घेणार नसल्याचे इस्रायलने आधीच बजावले होते. इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या सीमेजवळील हालचाली इस्रायलच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या ठरतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याची घोषणा इस्रायलने केली होती. इस्रायलच्या वर्तमानपत्राने लष्कराच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, २०२० सालात इस्रायलने सिरियात ५० ठिकाणी हल्ले चढविले.

गेल्या काही वर्षांमध्ये इराणने सिरियात आपली लष्करी पकड मजबूत करण्याच्या हालचाली वाढविल्या आहेत. यासाठी इराण सिरियाच्या वायव्येकडील तार्तूस आणि लताकिया येथे नौदलतळ आहे. तर राजधानी दमास्कसजवळ दोन मोठे तळ व शस्त्रास्त्रांचे कोठार आहे. या तळांवर हल्ले चढवून इराणला सिरियात पाय रोवू देणार नसल्याची घोषणा इस्रायलने केली होती.

दरम्यान, सिरियातील कारवाईची जबाबदारी इस्रायलच्या लष्कराने स्वीकारलेली नाही. पण सलग दुसर्‍या दिवशी इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हल्ले झाले आहेत. इस्रायलमधील सत्ताबदलानंतर अवघ्या चार दिवसात हे हल्ले झाल्याचे इस्रायली निरिक्षक व माध्यमे लक्षात आणून देत आहेत. उदारमतवादी गटांसह आघाडी सरकार स्थापन करणारे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट या कारवाईद्वारे इराणला इशारा देत असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info