इराणचा निवडणूक निकाल म्हणजे महासत्तांसाठी ‘फायनल वेक-अप कॉल’

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

जेरूसलेम – ‘इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी इब्राहिम राईसी यांची झालेली निवड म्हणजे अणुकरारासाठी प्रयत्न करणार्‍या महासत्तांना झोपेतून जागा करणारा अंतिम इशारा आहे. शेकडो इराणींना निर्दयीरित्या फासावर लटकविणार्‍या इराणच्या राजवटीच्या हाती सर्वसंहारक शस्त्रास्त्रे पडू देऊ नका’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. अमेरिकेला उद्देशून इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांनी दिलेला हा इशारा या सरकारची आक्रमक धोरणे स्पष्ट करीत आहे. दरम्यान, इराणच्या अणुप्रकल्पांवर नव्याने हल्ले चढविण्याची तयारी इस्रायलने करावी, असे आवाहन इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍याने केले आहे.

नफ्ताली बेनेट

इराणमधील निवडणुकीत इब्राहिम राईसी हे प्रचंड मताधिक्याने निवडणून आले. इराणमधील उदारमतवादी उमेदवारांवर मात करून राईस यांनी मिळविलेला हा विजय म्हणजे इराणचा विजय असल्याची घोषणा, इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला अली खामेनी यांनी केली. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाने तसेच गाझापट्टीतील हमास या संघटनेने राईसी यांच्या विजयाचे स्वागत केले. पण इस्रायलमध्ये सत्तेवर आलेल्या नफ्ताली बेनेट यांच्या सरकारने अमेरिकेला इशारा दिला.

दर रविवारी होणार्‍या साप्ताहिक कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी राईसी यांच्या विजयावर चिंता व्यक्त केली. ‘इराणच्या राजकीय व्यवस्थेने सर्वोच्च अधिकार बहाल केलेले धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी राईसी यांना सत्तेवर बसविले. मुक्त आणि पारदर्शी मतदानाद्वारे राईसी यांची निवड झालेली नाही’, असे सांगून इस्रायलच्या पंतप्रधानांनी राईसी यांच्या निवडीमागे कारस्थान असल्याचा आरोप केला.

नफ्ताली बेनेट

‘राईसी यांची राष्ट्राध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे अणुकरारासाठी प्रयत्न करणार्‍या महासत्तांना झोपेतून जागा करणारा अंतिम इशारा आहे. कारण अणुकरार करून या महासत्ता कोणत्या निर्दयी राजवटीला बळ पुरविणार आहोत, ते ओळखण्याची हीच अखेरची संधी आहे. शेकडो इराणी जनतेला निर्दयीरित्या फासावर लटकविणार्‍या या राजवटीच्या हाती सर्वसंहारक शस्त्रास्त्रे पडू देऊ नका’, असे पंतप्रधान बेनेट यांनी बजावले.

‘इस्रायलमध्ये सत्ताबदल झाला असला तरी, इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही, ही इस्रायलची भूमिका यापुढेही बदलणार नाही’, असे पंतप्रधान बेनेट यांनी जाहीर केले. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपीड यांनी देखील इराणचे राष्ट्राध्यक्ष घोषित इब्राहिम राईसी यांचा उल्लेख ‘बुचर ऑफ तेहरान’ अर्थात तेहरानचा कसाई, असा केला. इराणला अणुबॉम्बने सज्ज करण्याचे खामेनी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच जगभरात दहशतवाद पसरविण्यासाठी राईसी यांना इराणच्या राष्ट्राध्यक्षपदवर आणले जात असल्याचा ठपका इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला.

इस्रायलच्या सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, राईसी यांच्या निवडीवर चिंता व्यक्त केली. तसेच अणुबॉम्बनिर्मितीपासून इराणला रोखायचे असेल तर इराणच्या अणुप्रकल्पांवर नव्याने हल्ले चढविण्याची आवश्यकता असल्याचे या अधिकार्‍याने म्हटले आहे.

दरम्यान, राईसी हे इराणमधील जहालमतवादी नेते म्हणून ओळखले जातात. १९८८ साली इराणच्या राजवटीला विरोध करणार्‍या शेकडो राजकीय विरोधकांना फासावर देण्याचे आदेश राईसी यांनीच प्रमुख न्यायाधीश म्हणून दिले होते. त्यानंतर अमेरिकेने राईसी यांच्यावर कठोर निर्बंध लादले होते. असा जहाल नेता इराणच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर अमेरिकेने इराणबरोबर अणुकार्यक्रमावर वाटाघाटी करणे घातक ठरेल, याची जाणीव इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांनी करून दिली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info